महाराष्ट्र

मराठवाड्यात जागा कमी झाल्याने भाजपचे “चिंतन’:आमदारांच्या हजेरीत लाेकसभेच्या पराभवावर चर्चा

मुंबई/ भाजपने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विदर्भ विभागाची बैठक नागपुरात घेतली असून त्यानंतर मराठवाडा विभागाची बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सागर बंगल्यावर सोमवारी रात्री ८ वाजता आयोजित केली. यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह मराठवाड्यातील भाजप अमदरांची उपस्थिती होती. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचे चिंतन आणि विधानसभेच्या विजयाचे मंथन करण्यात आले. भाजपच्या वाट्याला येणाऱ्या जागेवर पक्ष कसा जिंकेल यासंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा सर्वाधिक फटका भाजपला बसल्याने त्याविरोधात या बैठकीत रणनीती आखण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्षानेही विधानसभेचा प्रचार सुरू केला आहे. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा बैठकीचे सत्र सुरू केले असून पक्ष एकसंघ राहावा, नेत्यांचे नाराजीनाट्य, उमेदवारीच्या अपेक्षा आणि संघटनात्मक गटबाजी यासंदर्भातसुद्धा फडणवीस बैठकीतील आमदारांकडून चाचपणी करून घेत असल्याचे दिसते आहे. लोकसभेत मराठवाड्यात मोठ्या अपयशाला भाजपला सामोरे जावे लागले. २०१९ च्या लोकसभेत भाजपच्या ताब्यात मराठवाड्यातील ८ पैकी ४ लोकसभा मतदारसंघ होते. मात्र, सध्या मराठवाड्यात बिकट स्थिती आहे.

४८ पैकी १७ आमदार

मराठवाड्यात ४८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी सध्या १७ विधानसभा मतदारसंघावर भाजपाचे विद्यमान आमदार आहेत. तर उर्वरित १५ मतदारसंघात महायुती मधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना घटक पक्षाचे विद्यमान आमदार आहेत. यामुळेच मराठवाड्यातील एकूण मतदारसंघापैकी ३२ मतदारसंघावर सध्या महायुतीचे वर्चस्व असले तरी भाजपाने मात्र मराठवाडा काबीज करण्यासाठी एकहाती ताकत लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

Related Articles

Back to top button