Uncategorized

बोरगडीच्या लेकीची मुंबईत भरारी! निलम काईतवाडची प्रतिष्ठित मुंबई व्हेटर्नरी कॉलेजमध्ये निवड

शासकीय कोट्यातून पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश; ग्रामीण भागातील विद्यार्थिनीच्या यशाचे सर्वत्र कौतुक

हिमायतनगर, : नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र बोरगडी येथील कु. निलम बालाजी काईतवाड हिने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिची मुंबई येथील प्रतिष्ठित मुंबई व्हेटर्नरी कॉलेजमध्ये बी.व्ही.एस्सी. अँड ए.एच. (B.V.Sc. & A.H.) या पशुवैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी शासकीय कोट्यातून निवड झाली आहे. तिच्या या यशामुळे बोरगडी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

निलमचे वडील बालाजी काईतवाड हे पोलीस सेवेत कार्यरत आहेत. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शिक्षणाच्या जोरावर तिने मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मुंबईसारख्या महानगरातील नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याने काईतवाड कुटुंबीयांसह नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

निलमच्या या यशाबद्दल गोल्ला-गोलेवार यादव महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भुमन्नाजी आक्केमवाड भोसीकर, प्रकाशराव करेवाड, सुभाषराव शिल्लेवाड, बाबाराव जरगेवाड, शिवाजी बोटेवाड यांच्यासह महासंघाचे विविध पदाधिकारी व समाजबांधवांनी तिचे अभिनंदन केले. तसेच तिचे काका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक दत्ता हासेप्पा काईतवाड यांनीही तिचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

ग्रामीण भागातील एका कन्येने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मुंबईपर्यंत मजल मारल्याने तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत असून, निलमची ही भरारी अनेक विद्यार्थिनींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.

Related Articles

Back to top button