संघर्षशील व्यक्तिमत्व : मनोहरराव देशपांडे

माणूस कसा जगला,यापेक्षा तो समाजाच्या किती कामाला आला,याची मोजदाद त्याच्या अखेरच्या प्रवासादरम्यानच होते.वतनदार घराण्यात जन्म घेतलेले माझे बाबा कै. मनोहरराव देशपांडे यांचे सबंध जीवन संघर्षातच गेले.आयुष्याच्या अखेरीपर्यंत आपला देशाई बाणा त्यांनी जपूण ठेवला. तत्कालीन निझाम राजवटीत माझे आजोबा कै.माधवराव देशाई यांना तब्बल २४ गावांची वतनदारी होती. घोडी,गाडे,लवाजमा असलेल्या माधवरांना ६ अपत्य.पण प्लेगसारख्या भयानक आजाराने एकापाठोपाठ ५ अपत्ये काळाच्या पडद्याआड गेली. त्यात जगले ते माझे वडील मनोहरराव.प्लेगसारखा रोग बळावत असतानाच बाबांच्या वयाच्या १२ व्या वर्षी एका दुर्धर आजाराने त्यांचे पितृछत्र हरपले. खेळण्याबागडण्याच्या वयात पितृछत्र हरवल्यानंतर काळाच्या ओघात वतनदारी अन् संपतीही गेली.त्यानंतर समज आलेल्या या वादळी पर्वाने अनेक संकटे पाहिली.शाळेची दोन आणे फिस वेळेत न देऊ शकणाऱ्या माझ्या बाबांनी अनेकांची शैक्षणिक फीस भरून त्यांना प्रवाहात आणले.वतनदारी,जमीन, जायदाद गेली, म्हणून त्यांनी कधीही खंत व्यक्त केली नाही.सन १९७२ ला अर्जापूर येथे पानसरे महाविद्यालयाची स्थापना झाली.तत्कालीन संचालकांनी माझ्या वडिलांना तेथे कारकुनाची नोकरी दिली.परंतु, अल्पावधीतच संस्थेच्या जबाबदार पदाधिकाऱ्याच्या हुकूमशाहीला झुगारून त्यांनी नोकरीचा त्याग केला.त्याचवेळी त्यांनी त्या पदाधिकाऱ्याला याच कॉलेजात मी संचालक म्हणून येईन, असे आव्हान दिले होते.योगायोगाने ते खरेच पानसरे महाविद्यालयाच्या संचालक मंडळात सहसचिव म्हणून आले.कालांतराने उपाध्यक्ष ते अध्यक्षांपर्यंत त्यांनी मजल मारली. अॅडजेस्टमेन्ट हा त्यांचा स्थायीभाव नव्हता.यामुळेच पालिकेच्या नोकरीत असूनही तिथल्या नगराध्यक्षांसोबत उघड दोनहात करुन घेतले. शेवटपर्यंत नरमाईची भूमिका त्यांनी घेतली नाही.आपली रोजीरोटी याच नोकरीवर आहे,याची जाणीव असतानाही त्यांनी तत्कालीन नगराध्यक्षांना दिल्लीचे सुप्रीम कोर्ट दाखविले.पत्रकारितेत रमलेल्या बाबांनी त्यांचे जीवलग मित्र एकनाथ शेरे यांच्यासोबत पत्रकारिता काय असते हे दाखवून दिले.कै.देविदासराव रसाळ,कै. सुधाकरराव डोअीफोडे,पन्नालाल सुराणा, आ. कॄ.वाघमारे यांच्या विशेष मर्जीतील पत्रकार अशी ओळख त्यांनी निर्माण केली. सर्वांशी अत्यंत सौहार्दाचे संबंध ठेवत असताना त्यांनी आपला रोखठोक,करारी बाणा आयुष्याच्या अखेरपर्यंत कायम ठेवला.मनमौजी स्वभावानुसारच ते जगले.कधी कोणाचा दबाब,दडपण त्यांनी सहन केलं नाही.त्यांच्याच प्रेरणेतून आम्ही तीनही भावंड पत्रकारितेत आलो.पत्रकारिता धर्म सांभाळताना कुणाचीही मुलाहिजा ठेवायची नाही,ही शिकवण होती.पालिकेच्चा नोकरीसह पत्रकारितेतून त्यांनी सामान्याला न्यायच देण्याचा प्रयत्न केला.पत्रकारिता,प्रशासन,राजकीयक्षेत्रात रमणाऱ्या बाबांना वाचन,संगीत ऐकण्याचा छंद होता.गझलमध्ये ते खूप रमायचे.यासोबतच त्यांच्या संपर्कात असलेल्यांची ती हुबेहुब नकला करीत होते.एक प्रगल्भ प्रशासक,कायद्याचे अभ्यासक,पत्रकारितेतील गुरु माझे वडील कै. मनोहरराव देशपांडे यांना प्रथमस्मृतीदिनी विनम्र अभिवादन ! – आशिष देशपांडे.

