Uncategorized
अस्वल हल्ल्यात मृत शेतकऱ्याच्या वारसांना १० लाखांची मदत

किनवट (प्रतिनिधी) : तालुक्यातील दयाळधानोरा येथील बहुचर्चित अस्वल हल्ला प्रकरणात मृत्यू झालेल्या शेतकरी चंद्रसिंग शेषेराव राठोड (वय ४७) यांच्या वारसांना शासन नियमाप्रमाणे तात्काळ १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
१० फेब्रुवारीच्या मध्यरात्री मृत पिलाच्या शोधात असलेल्या मादी अस्वलाने शेतात पिकाला पाणी देत असताना चंद्रसिंग राठोड यांच्यासह इतर शेतकऱ्यांवर हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राठोड यांना इतर चार जखमींसह उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालय (घाटी) येथे हलविण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असताना १६ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर त्यांच्या पश्चात वारसदार पत्नी कल्पनाबाई राठोड तसेच मुलगे कुमार राठोड व धर्मराज राठोड यांना वन विभागामार्फत १० लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) आप्पारावपेठ उमेश ढगे यांच्या हस्ते हा धनादेश देण्यात आला.
यावेळी वनपरिमंडळ अधिकारी श्रीराम व्ही. सज्जन, वनरक्षक डी. डी. कडमपल्ले, कृष्णा घायाळ, आर. आर. वनवे, संतोष सारगुडे, गणेश सपकाळ, बी. टी. जाधव, वसंत भालेराव तसेच वाहनचालक ज्ञानेश्वर माहुरे, संगणक चालक कुलदीप पाटील, सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, नाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आतापर्यंत तालुक्यातील दयाळधानोरा येथील १० फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या अस्वल हल्ला प्रकरणात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसांना शासन नियमाप्रमाणे प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.



