नागपुरात संदेश केराम यांनी घेतली रुग्णांची आस्थेने विचारपूस; रुग्णसेवेतून माणुसकीचा हातभार!
मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आतापर्यंत 500रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया मतदारसंघ मोतीबिंदूमुक्त करण्याचा संकल्प

किनवट : आमदार भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरांतर्गत आतापर्यंत नऊ टप्प्यांत सुमारे 500 रुग्णांवर नागपूर येथील महात्मे आय हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
14 ऑगस्ट रोजी कलावती गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या नेत्रतपासणी शिबिरात 3500 हून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सुमारे 800 रुग्णांना मोतीबिंदू तसेच अन्य नेत्रशस्त्रक्रियांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले. या रुग्णांवर पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांच्या महात्मे आय हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. रुग्णांना किनवट-माहूर मतदारसंघातून नागपूर येथे ये-जा करण्यासाठी मोफत बससेवाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
दरम्यान, युवा नेते संदेश भाऊ केराम यांनी नागपूर येथील महात्मे आय हॉस्पिटलला भेट देत शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत प्रत्येक रुग्णाशी वैयक्तिक संवाद साधत त्यांना धीर व विश्वास दिला. यावेळी पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे, संदेश भाऊ केराम सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी तसेच आरोग्यदूत अमन कुंडगीर उपस्थित होते.
किनवट-माहूर मतदारसंघातील जास्तीत जास्त रुग्णांना मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी ही मोहीम पुढेही सुरू ठेवण्यात येणार आहे. यासाठी लागणारे आवश्यक सहकार्य व मदत करण्याची ग्वाही डॉ. विकास महात्मे यांनी दिली.
यावेळी मतदारसंघातील गरजू व वृद्ध रुग्णांशी संदेश केराम यांनी आपुलकीने संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. रुग्णांची वैयक्तिक पातळीवर घेतलेली आस्थेने विचारपूस पाहून अनेक रुग्ण भावुक झाले. रुग्णसेवेच्या माध्यमातून माणुसकीचा जिव्हाळा जपणारा हा उपक्रम ठरत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.



