प्रसिद्धीनंतर प्रशासनाची दखल; शिवलिंगाकार गुलाबी कमळ तलावाला सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांची भेट

उनकेश्वर, दि. १२ (प्रतिनिधी): वृत्तपत्रांमधील प्रसिद्धीनंतर पौराणिक तीर्थक्षेत्र उनकेश्वर येथील दुर्लक्षित शिवलिंगाकार गुलाबी कमळ तलावाची प्रशासनाने दखल घेतली आहे. किनवट पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी शनिवारी तलावाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. तलावाच्या पर्यटन विकासासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
शरभंग ऋषी आश्रम, गरम पाण्याचे झरे आणि हेमाडपंथी शिवमंदिरामुळे प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र उनकेश्वरपासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर पैनगंगा नदीच्या तीरावर हा नैसर्गिक गुलाबी कमळ तलाव आहे. शिवलिंगाच्या आकारासारखा दिसणारा हा तलाव वन विभागाने पर्यटनस्थळ म्हणून मंजूर केला असला, तरी निधीअभावी अद्याप विकासकामे सुरू झालेली नाहीत. मात्र तलावाचे निसर्गरम्य सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करत आहे.
यावेळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी निवृत्ती मुकणर यांनीही तलाव परिसराची पाहणी केली. आदिवासी समाजातील आयुर्वेदिक वनस्पतींचे अभ्यासक वैद्य आकाश सोयाम यांनी परिसरातील विविध दुर्मिळ औषधी वनस्पतींची माहिती अधिकाऱ्यांना दिली. अर्जुन, पिंपळ, वड, पळस, बहावा, आवळा, बेल, गुळवेल, कडूलिंब, बेहडा, करंज, जांभूळ, बाभूळ, चारोळी, कवठ, आडुळसा, कोरफड, पानफुटी आदी अनेक औषधी वनस्पतींचे महत्त्व त्यांनी विशद केले.
भेटीदरम्यान सरपंच पुंडलिक गेडाम, श्याम शहारे, संतोष देशमुख, मोती रबडे, संतोष निलगिरवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या नैसर्गिक वारशाचा पर्यटनदृष्ट्या विकास करून त्यांच्या संवर्धनासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.



