महात्मा फुलेंचा समतेचा विचार समाजासाठी दिशादर्शक : आमदार भीमराव केराम किनवटमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात; विविध मान्यवरांची उपस्थिती

किनवट (प्रतिनिधी) : समाजपरिवर्तनाचा पाया शिक्षणातून घालणारे महात्मा ज्योतिराव फुले आणि स्त्री-शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन आमदार भीमराव केराम यांनी केले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त किनवट येथे आयोजित मुख्य कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार केराम यांच्या हस्ते महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शहरात यानिमित्त उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
“दीन-दलित आणि महिलांच्या उन्नतीसाठी फुले दाम्पत्याने दिलेला लढा आजच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल,” असे आमदार केराम यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला नगराध्यक्षा सुजाता येंड्रलवार, प्रा. डॉ. रामप्रसाद तौर, पोलीस निरीक्षक गणेश कराड, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छवार, भाजप शहराध्यक्ष स्वागत आयलेनिवार, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष विनोद भरणे यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांनी आपल्या भाषणातून महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी विचारांना उजाळा दिला.
यावेळी आमदार केराम यांनी फुलेंच्या ‘सत्यशोधक’ विचारसरणीवर तसेच सावित्रीबाईंच्या स्त्री-शिक्षणातील ऐतिहासिक योगदानावर सविस्तर भाष्य केले. प्रतिकूल परिस्थितीत फुले दाम्पत्याने उभारलेला समाजपरिवर्तनाचा लढा आजच्या काळात अधिकच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास नगरसेवक संतोष मरसकोल्हे, नगरसेविका सौ. ललिता मारोती मुनेश्वर, सामाजिक कार्यकर्त्या गंगुबाई पारेकार, यशवंत जाधव, यशवंत कराळे यांच्यासह जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जयंती उत्सव समितीच्या वतीने कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले होते. परिसरातील नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत फुले दाम्पत्याच्या विचारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.



