Uncategorized

शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत द्या!

माहूर तालुका काँग्रेसची मोटारसायकल रॅली; तहसीलदारांना निवेदन, नगरपंचायतीतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीचीही मागणी

श्रीक्षेत्र माहूर, दि. २९ : कोरड्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, घरकुल लाभार्थ्यांची थकीत रक्कम तातडीने वितरित करावी आणि माहूर नगरपंचायतीतील विविध विकासकामांच्या कथित भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशा विविध मागण्यांसाठी माहूर तालुका काँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि. २९) मोटारसायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे आणि तालुकाध्यक्ष आनंद गंगाधरराव पाटील तुपदाळे यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीनंतर तहसीलदार अभिजीत जगताप यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शासनाच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

माहूर तालुक्यात कोरड्या दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतीचा वाढता खर्च, पिकांचे नुकसान आणि घटलेले उत्पन्न यामुळे शेतकरी कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे परिस्थितीचे तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये मदत द्यावी. तसेच पीक नुकसानभरपाई, दुष्काळी अनुदान व अन्य शासकीय मदतीचे वितरण तातडीने करावे, अशी मागणी काँग्रेसने केली.

माहूर नगरपंचायत क्षेत्रातील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीतील कथित अनियमितता आणि लाभार्थ्यांच्या थकीत अनुदानाबाबत स्वतंत्र चौकशी करावी. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात प्रलंबित रक्कम जमा करावी, तसेच दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

नगरपंचायतीमार्फत २०१७ पासून करण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पांची तसेच २०२४ पासूनच्या रस्ते व नाल्यांच्या कामांची तांत्रिक आणि आर्थिक तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. संबंधित कामांची निविदा प्रक्रिया, खर्च, देयके आणि बांधकामाचा दर्जा तपासून अनियमितता आढळल्यास जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, अशी काँग्रेसची भूमिका आहे.

याशिवाय लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविषयीच्या आक्षेपांवर घटनात्मक तरतुदींनुसार निष्पक्ष विचार करावा, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. यासंदर्भात आंदोलनकर्त्यांनी ‘ज्ञानेश हटाव, देश बचाव’ अशा घोषणा दिल्या.

काँग्रेसमध्ये तिघांचा प्रवेश

या कार्यक्रमादरम्यान अनिल पवार नाईक, सुभाष जाधव आणि पवन सावळे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी त्यांचा सन्मान केला.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, जिल्हा सरचिटणीस अशोकराव बुटले, माजी उपनगराध्यक्ष सौ. अश्विनी आनंद तुपदाळे-पाटील यांच्यासह अमीन सय्यद, मोबीन शेख, अनिल पाटील जाधव, अनिल मडपेल्लीवार, सादिक शेख, मुसा, जयकुमार अडकिने, शरीफ शेख, विठ्ठल, प्रेमसिंग राठोड, मनोज बाबुलाल जाधव, राजू सौंदलकर, राजू बोळे, माधव मुंडे, अब्दुल गफार, राजू राठोड, कारभारी शेख, जावेद, शोएबखा नबीखा सय्यद, रेहान, सलमान खान, इमरान खान, सावन चव्हाण, खाजा खान, जायद शेख, आदिल शेख आणि शेख तोफिक यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button