पत्नीने किडनी देऊन पतीला दिले जीवदान!
रवी कांबळे यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वी; मित्रपरिवारासह दानशूरांनीही उभा केला मदतीचा हात

किनवट, राजेश पाटील : पती-पत्नीचे नाते हे प्रेम, विश्वास आणि त्यागाच्या अतूट बंधनाने जोडलेले असते. संकटाच्या काळात या नात्याची खरी ताकद दिसून येते. किनवट येथील रवींद्र (रवी) कांबळे यांच्या बाबतीत याचीच प्रचिती आली. दोन्ही किडन्या निकामी झाल्याने जीवन-मृत्यूच्या संघर्षाला सामोरे जाणाऱ्या रवी कांबळे यांना पत्नी कल्पना यांनी स्वतःची किडनी दान करून जीवदान दिले. त्यांच्या या त्यागासोबतच मित्रपरिवार आणि दानशूर व्यक्तींनी केलेली आर्थिक मदतही मोलाची ठरली.
रवी कांबळे हे चित्रपट, शॉर्ट फिल्म, लोकगीते, आदिवासी गीते आणि भीमगीतांच्या अल्बममध्ये काम करणारे कलावंत आहेत. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या. उपचारासाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज असताना कुटुंबासमोर मोठे संकट उभे राहिले. अशा कठीण प्रसंगी पत्नी कल्पना यांनी किडनी दान करण्याचा निर्णय घेत पतीच्या आयुष्याला नवी आशा दिली.
१० जुलै रोजी यशस्वी शस्त्रक्रिया
छत्रपती संभाजीनगर येथील कमलनयन बजाज रुग्णालयात १० जुलै २०२६ रोजी रवींद्र कांबळे यांचे किडनी प्रत्यारोपण यशस्वीरीत्या करण्यात आले. या उपचार प्रक्रियेत डॉ. समीर महाजन आणि डॉ. निखिल इंगळे यांनी मोलाची मदत केली, तर डॉ. अजय ओसवाल यांनी शस्त्रक्रिया केली. सुभाष गवारे यांचेही या संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
मित्रपरिवाराची माणुसकी ठरली आधार
शस्त्रक्रियेसाठी आवश्यक आर्थिक मदत उभी करण्यासाठी रवी कांबळे यांच्या मित्रांनी दिवस-रात्र प्रयत्न केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करण्यात आले. युवा नेते करण अण्णा एन्ड्रलवार आणि अभियंता प्रशांतजी ठमके यांनी मोठे आर्थिक योगदान दिले. त्यांच्या फिल्मी क्षेत्रातील सहकाऱ्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला.
यामध्ये रमेश गंदेवार (किनवटचा आप्पा), शेख आतीफ (दिग्दर्शक), सुरेश माहुरकर (पुष्पा), प्रमोद कानिंदे, हृदय मोहिते, किरण ठोके, निवेदक कानिंदे, सचिन कनाके आणि राजू पाटील यांनी परिश्रम घेत आर्थिक मदत गोळा केली.
पत्नीने किडनी दान करून दाखवलेला त्याग आणि मित्रपरिवारासह दानशूरांनी दिलेली साथ यामुळे रवी कांबळे यांना जीवनाची नवी उमेद मिळाली. संकटाच्या काळात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा प्रत्यय या घटनेतून आला आहे.



