Uncategorized

घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप; केशव भगत यांच्याविरोधात गुन्हा

मारहाण करून सोन्याचे गंठण तोडून नेल्याचीही तक्रार; जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

माहूर : घरात घुसून महिलेचा हात धरत अश्लील शिवीगाळ करून विनयभंग केल्याचा, तसेच झटापटीदरम्यान साडी ओढून लज्जाभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत एका महिलेने माहूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरून केशव गणपत भगत (४८, रा. माहूर) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, ९ सप्टेंबर रोजी दुपारी १ ते २ वाजण्याच्या सुमारास संबंधित महिला आपल्या मुलीसह घरात होती. तिचा पती घराबाहेर गेल्याचे पाहून केशव भगत घरात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. घरात आल्यानंतर त्याने महिलेचा हात धरून तिच्या पतीबाबत विचारणा केली. यावेळी अश्लील भाषेत शिवीगाळ करून पतीबाबत अपशब्द वापरल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

यानंतर झालेल्या झटापटीत आरोपीने महिलेच्या छातीला हात लावल्याचा तसेच तिने विरोध केल्यानंतर तिची साडी ओढून तिला लज्जित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. महिलेने आरडाओरड केल्यानंतर तिची मुलगी धावत आली. त्यावेळी आरोपीने महिलेचे केस धरून तिला खाली पाडल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

गंठण तोडून नेल्याचा आरोप

याच झटापटीदरम्यान महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे सोन्याचे गंठण तोडून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. या गंठणाची अंदाजे किंमत ३ लाख ६० हजार रुपये असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून जाताना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप महिलेने केला आहे.

तक्रारीच्या आधारे माहूर पोलिसांनी BNS कलम ७४, ७६, ११५(२), २९६, ११९(१), ३२९, ३५१(१), ३५१(२) आणि ३५२ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक शरद घोडके करीत आहेत.

दरम्यान, तक्रारीतील आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू असून, तपासानंतर घटनेमागील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Back to top button