नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 2 हजार शेतकऱ्यांना 861 कोटींची कर्जमुक्ती
तीन याद्यांमध्ये 1 लाख 97 हजार शेतकरी पात्र; 1 लाख 41 हजार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण

नांदेड, दि. 20 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील 1 लाख 2 हजार 218 शेतकऱ्यांच्या खात्यावर 861.56 कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. शासनाने जाहीर केलेल्या तीन याद्यांमध्ये जिल्ह्यातील 1 लाख 97 हजार 912 शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी 1 लाख 41 हजार 835 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे.
शासनाच्या 2 जून 2026 रोजीच्या निर्णयानुसार ही योजना राज्यात लागू करण्यात आली आहे. अल्प, अत्यल्प किंवा बहुभूधारक असा भेदभाव न करता, निकषांनुसार पात्र वैयक्तिक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येत आहे.
2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी
योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले अल्पमुदतीचे पीककर्ज किंवा या काळात पुनर्गठित झालेले पीककर्ज 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असून, 31 मार्च 2026 पर्यंत त्याची परतफेड झाली नसल्यास पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार आहे.
2 लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना (OTS) लागू आहे. या योजनेनुसार 2 लाख रुपयांवरील थकीत रक्कम 31 मार्च 2027 पूर्वी भरल्यास पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार आहे.
तसेच 2022-23, 2023-24 आणि 2024-25 या तीन वर्षांपैकी किमान 2 वर्षे पीककर्जाची मुदतीत परतफेड केलेल्या आणि 2025-26 मधील पीककर्जाचीही मुदतीत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यात 3 याद्या जाहीर
नांदेड जिल्ह्यातील बँकांनी योजनेच्या पोर्टलवर एकूण 2 लाख 24 हजार 847 थकीत कर्जखात्यांची माहिती अपलोड केली आहे. संगणकीय प्रक्रियेनंतर पात्र शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर करण्यात येत आहेत.
पहिली यादी 25 जुलै 2026, दुसरी यादी 11 सप्टेंबर 2026 आणि तिसरी यादी 12 ऑक्टोबर 2026 रोजी जाहीर झाली आहे. पुढील याद्याही टप्प्याटप्प्याने जाहीर होणार असून, आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर नियमानुसार रक्कम जमा करण्यात येणार आहे.
त्यामुळे यादीत नाव आले नसल्यास शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये किंवा कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
1,666 तक्रारींचे निराकरण
योजनेच्या लाभाबाबत शंका किंवा यादीत नाव नसल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा. तसेच तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती किंवा तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात तक्रार नोंदवावी.
जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा एकूण 1 हजार 840 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी 1 हजार 666 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नांदेड यांच्या कार्यालयात स्वतंत्र तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आला आहे. सहायक निबंधक (प्रशासन) ए. डी. भागानगरे हे या कक्षाचे नोडल अधिकारी आहेत. शेतकऱ्यांनी योजनेशी संबंधित तक्रारींसाठी 9284350731 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बोरगाव तेलंग येथील शेतकऱ्याच्या कर्जाबाबत स्पष्टीकरण
बोरगाव तेलंग येथील शेतकरी शंकर अबानराव क्षीरसागर यांनी कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्यामुळे आत्महत्या केल्याची माहिती समाजमाध्यमांवर प्रसारित झाली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने त्यांच्या कर्जखात्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
क्षीरसागर यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वजिराबाद शाखेतून 26 सप्टेंबर 2023 रोजी 1 लाख 60 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. परतफेड न झाल्यामुळे 31 मार्च 2026 अखेर त्यांच्या कर्जखात्यावर 2 लाख 8 हजार 104 रुपये थकबाकी होती.
संबंधित कर्जाची माहिती बँकेने कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर अपलोड केली असून, हे कर्ज एकरकमी परतफेड योजनेसाठी (OTS) पात्र असल्याचे बँकेने कळविले आहे. या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांवरील थकीत रक्कम भरल्यानंतर नियमानुसार 2 लाख रुपयांपर्यंतचा लाभ मिळू शकतो.
संबंधित शेतकऱ्याने यादीत नाव नसल्याबाबत तालुका उपनिबंधक कार्यालयात तक्रार केल्याचे आढळले नसल्याचे, तसेच त्यांनी योजनेबाबत बँकेशी संपर्क साधला नसल्याचे बँक अधिकाऱ्यांनी कळविल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शेतकऱ्यांनी तक्रारींसाठी संपर्क साधावा
कर्जमुक्ती योजनेबाबत कोणतीही शंका असल्यास शेतकऱ्यांनी संबंधित बँक, तहसीलदार, तालुकास्तरीय तक्रार निवारण समिती किंवा सहायक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. पात्र शेतकऱ्यांना योजनेच्या निकषांनुसार लाभ मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे सांगत, यादीत नाव नसल्याने शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये आणि कोणताही अनुचित निर्णय घेऊ नये, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, शाहुराज हिरे यांनी केले आहे.



