Uncategorized

मतदार यादीतील अनियमिततेच्या निषेधार्थ काँग्रेसचे निवेदन

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखांची मदत देण्याचीही मागणी

किनवट, दि. २९ : मतदार यादीतील संभाव्य अनियमिततेची निष्पक्ष चौकशी करावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि नांदेड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये आर्थिक मदत द्यावी, अशा विविध मागण्यांसाठी किनवट तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात, लोकशाही व्यवस्थेत निवडणूक प्रक्रिया निष्पक्ष, पारदर्शक आणि विश्वासार्ह असणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानांतर्गत मतदार यादीतील संभाव्य अनियमितता, दुबार नोंदी तसेच पात्र मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारींची सखोल चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची सक्षम प्राधिकरणामार्फत निष्पक्ष चौकशी करून निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता व उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. तसेच या प्रकरणाची दखल घेऊन निवेदन वरिष्ठ प्राधिकरणाकडे पाठवावे, असेही नमूद करण्यात आले आहे.

यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी मतदारांच्या अधिकारांचे संरक्षण आणि लोकशाही व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कायम राखण्याची गरज व्यक्त केली.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती

या वेळी नांदेड जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे, नांदेड उत्तरचे उपाध्यक्ष नागराज सुलगेकर, महाराष्ट्र सचिव धर्मराज राठोड, जिल्हा उपाध्यक्ष के. सूर्यकांतरेड्डी माधवरेड्डी, के. मुर्ती, सिराज जिवाणी, शहराध्यक्ष गिरीष नेम्मानीवार, जिल्हा संघटक फस्सीउल्ला खान, तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष शमशेर खिच्ची, माजी नगरसेवक लक्ष्मीपती दर्दानपेल्लीवार, सुभाषबाबू नायक राठोड, वसंत राठोड, अ. खालीद, गणीभाई, शे. शादुल्ला, जवाद आलम, शिवम राठोड, फारूख चव्हाण, सय्यद अनवर, माधव खेडकर आणि शेख जावेद चिखलीकर यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button