वाढदिवसाचा आनंद वृक्षारोपणातून; इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात १०० रोपे
लायन योगेश जायसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम; कै. रामगोपाल गुप्ता इंडस्ट्रियल इस्टेट, लायन्स फॅमिली व वृक्षमित्र फाउंडेशनचा संयुक्त पुढाकार

नांदेड, दि. १३ : पर्यावरण संवर्धनासोबतच ‘हरित नांदेड’च्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत कै. रामगोपाल गुप्ता कॉ-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेट, शिवाजीनगर, लायन्स फॅमिली आणि वृक्षमित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ चे उपप्रांतपाल लायन योगेश जायसवाल यांच्या वाढदिवसानिमित्त हॉटेल सेंटर पार्कजवळील इंडस्ट्रियल इस्टेट परिसरात १०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
लायन योगेश जायसवाल तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कदंब, बकुळ, करंज, कडुनिंब आदी विविध प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. परिसराचे सौंदर्यीकरण, पर्यावरणाचे रक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
वाढते प्रदूषण, बदलते हवामान आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेली हिरवाई यामुळे वृक्षसंवर्धन ही काळाची गरज बनली आहे. वृक्षांमुळे केवळ प्राणवायू मिळत नाही, तर पर्यावरणाचा समतोल राखणे, मातीची धूप रोखणे, पक्षी व जैवविविधतेला अधिवास उपलब्ध करून देणे तसेच परिसरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. त्यामुळे वृक्षारोपणासोबतच लावलेल्या प्रत्येक रोपाचे नियमित संगोपन करणे हीच खरी पर्यावरणसेवा असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
या उपक्रमाचे आयोजन कै. रामगोपाल गुप्ता कॉ-ऑप. इंडस्ट्रियल इस्टेटचे चेअरमन लॉ. सतीश सामते आणि प्रोजेक्ट चेअरमन लॉ. रवि कडगे (डिस्ट्रिक्ट जीएमटी को-ऑर्डिनेटर) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
यावेळी माजी उपप्रांतपाल जयेश ठक्कर, वर्षा ठक्कर, अमृता जायसवाल, अॅड. प्रविण अग्रवाल, करुणा अग्रवाल, क्षेत्रीय अध्यक्ष सुरभी माहेश्वरी, लायन्स क्लब नांदेड मिडटाऊनचे अध्यक्ष सरताजसिंघ, सचिव विनायक चव्हाण, कंधारवाले, कोषाध्यक्ष केदार मालपाणी, लॉ. शिरीष कासलीवाल, ज्ञानेश्वर थिटे, लॉ. राजेंद्र हुरणे, राजश्री हुरणे, मनप्रीत कौर, स्मिता कडगे, सतीश शिरूरकर, सुनंदा शिरूरकर, मुकेश अग्रवाल, शैली अग्रवाल, अमरसिंह चौव्हाण, ओमप्रकाश मानधने, अल्का मानधने, सुनीता चौव्हाण, नरेश व्होरा, प्रदीप सोनपेठकर, शिवाजी इबीतवार, रवि कासलीवाल, रमेश रेड्डी, अर्जुन पदमाम, विजय होकर्णे तसेच वृक्षमित्र फाउंडेशनचे शैलेन्द्र क्षीरसागर, प्रितम भराडीया, सुधाकर चेरकुला आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लावलेल्या रोपांचे नियमित संगोपन करण्याचा संकल्प केला. वाढदिवसाचा आनंद केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता वृक्षारोपणासारख्या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमातून साजरा करण्याचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा ठरला.
छायाचित्र : विजय होकर्णे



