APL शेतकरी लाभार्थ्यांना रोख अनुदान मिळाले नाही; तहसीलदारांना निवेदन

किनवट : महाराष्ट्र शासनाने राशनधारक शेतकऱ्यांना धान्याऐवजी थेट त्यांच्या बँक खात्यात रोख रक्कम जमा करण्याची योजना सुरू केली असली तरी किनवट तालुक्यातील अनेक APL शेतकरी लाभार्थ्यांना गेल्या सुमारे वर्षभरापासून या योजनेचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
यासंदर्भात किनवट तालुका भारतीय जनता पक्ष आदिवासी मोर्चाचे अध्यक्ष संतोष पांडुरंग कनाके यांनी तहसीलदार, तहसील कार्यालय किनवट यांना लेखी निवेदन सादर केले. यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते गोविंद सिरमनवार उपस्थित होते.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शासनाने धान्याऐवजी मोबदल्याची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची योजना लागू केली असली तरी अनेक APL राशनकार्डधारक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्यापपर्यंत रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून योजनेचा प्रत्यक्ष लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
या प्रकरणाची तहसील प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन प्रलंबित रकमेची चौकशी करावी व गेल्या वर्षभरातील थकीत रक्कम संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात लवकरात लवकर जमा करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी, नांदेड तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी, किनवट यांनाही देण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



