Uncategorized

जूनअखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी; नियमित कर्जफेड करणाऱ्यांनाही अनुदान

सातारा : राज्यातील शेतकऱ्यांना जूनअखेर कृषी कर्जमाफी दिली जाणार असून नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यात केली.

प्रधानमंत्री आवास योजना लाभार्थी मेळावा आणि महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत राज्य सरकार गंभीर असून केंद्राच्या माध्यमातून कांदा प्रतिकिलो 12.35 रुपये दराने खरेदी केला जाणार आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्याला 30 लाख घरांची मंजुरी मिळाली आहे. घरांना 45 दिवसांत मान्यता देऊन टप्प्याटप्प्याने निधी वितरित केला जात आहे. आतापर्यंत 5 लाख घरे पूर्ण झाली असून पुढील टप्प्यात आणखी 15 लाख घरे बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे.

राज्यात “बेघरमुक्त महाराष्ट्र” करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button