किनवटमध्ये आमदार प्रीमियर लीगचा थरार संपन्न; करण सुपर किंग्स ठरला महाविजेता

किनवट – किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे नुकत्याच पार पडलेल्या ‘आमदार प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेने तालुक्यातील क्रीडाप्रेमींना अविस्मरणीय अनुभव दिला. नियोजनबद्ध, शिस्तबद्ध आणि दर्जेदार पद्धतीने पार पडलेली ही स्पर्धा किनवटच्या क्रीडा इतिहासात ऐतिहासिक ठरली आहे.
या भव्य स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामागे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संदीप केंद्रे, प्रदीप केंद्रे, डॉ. नागरगोजे, डॉ. बामणे आणि शेख माजिद यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नियोजनामुळे, काटेकोर व्यवस्थापनामुळे आणि संघभावनेतून केलेल्या प्रयत्नांमुळे स्पर्धा अत्यंत यशस्वीरीत्या पार पडली. आयोजकांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
या स्पर्धेमुळे किनवट तालुक्यातील अनेक उदयोन्मुख व गुणवंत खेळाडूंना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळाली. स्थानिक खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. संपूर्ण आठवडाभर किनवटमध्ये क्रिकेटचा उत्साह ओसंडून वाहत होता.
अंतिम सामन्यात करण सुपर किंग्स संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत मुंडे वॉरियर्स संघावर दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले. विजेत्या संघाला प्रथम पारितोषिक म्हणून रुपये १ लाख ५० हजारांची रक्कम आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.
पारितोषिक वितरण सोहळ्यास आमदार भीमराव केराम, युवा नेते करण येड्रलवार, पोलीस निरीक्षक गणेश कराड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार भीमराव केराम म्हणाले, “ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये प्रचंड गुणवत्ता असते. त्यांच्यातील खेळाडूवृत्ती जागृत व्हावी आणि त्यांना आपली गुणवत्ता दाखविण्याची संधी मिळावी, या उद्देशाने अशा स्पर्धांचे आयोजन सातत्याने होत राहावे. अशा स्पर्धांमुळे भविष्यात ग्रामीण भागातून उत्तम खेळाडू पुढे येतील.”
सदर सामने आंतरराज्य आयपीएलच्या नियमांनुसार विशाल मैदानावर पार पडले. शिस्तबद्ध नियोजन आणि लाखोंच्या संख्येने उपस्थित राहिलेल्या क्रिकेटप्रेमींमुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभले.
सर्व विजयी संघ आणि खेळाडूंचे क्रीडा क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.



