अंबाडीच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव

किनवट – तालुक्यातील अंबाडी या २ हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या थेट जनतेतून निवडून आलेल्या महिला सरपंचाच्याविरुद्घ उपसरपंचासह ७ सदस्यांनी मंगळवारी दि.२६ किनवटच्या तहसीलदारांकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे. बोधडी ( बु.) पाठोपाठ अंबाडी ग्रामपंचायतीत गेल्या काही दिवसांपासून थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच शीतल गिरीराज जाधव व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये बेबनाव आहे.गत ३ वर्षांपासून सरपंच व सदस्यांत या न त्या कारणावरून धुसफूस सुरुच आहे.यातूनच उपसरपंच दीपक तामगाडगे व सदस्य लक्ष्मण ठमके,नितीपा देठे,ज्योत्सना तामगाडगे,किसन आडे,मारूती पेंदोर,संगीता अंबादास गेडाम यांनी सरपंच शीतल जाधव ह्या ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात घेत नाहीत,वेळेवर ग्रामसभा घेत नाहीत,आदी कारणे पुढे करीत मंगळवारी त्यांच्याविरोधात किनवटच्या तहसीलदार डॉ.शारदा चौंडेकर यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला.या अविश्वास प्रस्तावावर गुरुवारी दि.२८ तहसीलदार डॉ.शारदा चौंडेकर यांच्या अध्यक्षतेखालील विशेष सभेत चर्चा होणार आहे.काही दिवसांपूर्वीच बोधडी बु.च्या ग्रामपंचायत सदस्यांनी तेथील सरपंचांना नाकारत त्यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव आणला होता.परंतु,ग्रामसभेत ग्रामस्थांनी अर्थात मतदारांनी त्यांना स्वीकारले.आता अंबाडीत तीच पुनरावृत्ती होणार की,सरपंचांना पद सोडावे लागणार,याकडे सर्वांचे लक्ष आहे.



