Uncategorized

आदिवासी धर्मचिंतन परिषद व क्षेत्रबंधन मुक्ती दिन उत्साहात

किनवटमध्ये हजारो आदिवासी बांधवांची उपस्थिती; स्वतंत्र धर्म कोड, सांस्कृतिक व धार्मिक ओळखीचा निर्धार

किनवट : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नांदेड शाखेच्या वतीने आयोजित आदिवासी धर्मचिंतन परिषद व आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिनाचा कार्यक्रम रविवारी (दि. २०) एन. के. गार्डन, किनवट येथे उत्साहात पार पडला. किनवट तालुक्यासह विविध गावांमधून आदिवासी समाजबांधव, महिला व युवक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. परिषदेत आदिवासी समाजाची स्वतंत्र सांस्कृतिक व धार्मिक ओळख, निसर्गपूजक परंपरा, जनगणनेतील स्वतंत्र नोंद, पारंपरिक हक्क आणि सामाजिक एकजुटीच्या विषयांवर विचारमंथन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री शिवाजीराव मोघे होते. उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून तेलंगणा राज्यातील खानापूरचे आमदार वेडमा भोजू पटेल उपस्थित होते, तर प्रमुख मार्गदर्शक दशरथजी मडावी यांनी मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी क्षेत्रबंधनाचा इतिहास व त्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली. क्षेत्रबंधन मुक्तीच्या प्रक्रियेत तत्कालीन राष्ट्रपती डॉ. फखरुद्दीन अली अहमद, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, मुख्यमंत्री वसंतराव नाईक तसेच माजी मंत्री बाबुराव मडावी व त्यांच्या सहकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. क्षेत्रबंधन मुक्त झाल्यामुळे देशातील आदिवासी समाजाला त्याचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

‘धर्म कोड लागू झाल्याशिवाय शांत बसणार नाही’

आदिवासी समाजाच्या स्वतंत्र धार्मिक ओळखीच्या प्रश्नावर बोलताना शिवाजीराव मोघे म्हणाले, “आदिवासी धर्माची स्वतंत्र नोंद व्हावी आणि धर्म कोड लागू करून घेणारच. आदिवासींना धर्म कोड लागू झाल्याशिवाय शांत बसणार नाही.” जनगणनेत आदिवासी समाजाची स्वतंत्र ओळख स्पष्टपणे नोंदविण्यासाठी समाजाने जागरूक राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील जात पडताळणी कार्यालयाचे कामकाज किनवटमध्ये उपलब्ध करून देण्याची मागणीही केली. जात पडताळणीसाठी आदिवासी नागरिकांना होणारा प्रवास व त्रास कमी करण्यासाठी किनवटमध्येच ही सुविधा उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दशरथजी मडावी यांनी आदिवासी धर्म, निसर्गपूजक जीवनपद्धती, रूढी-परंपरा आणि सांस्कृतिक वारशावर सविस्तर भाष्य केले. आदिवासी समाजाच्या स्वतंत्र ओळखीचे जतन करण्यासाठी इतिहास, संस्कृती व परंपरांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच आदिवासी समाजाला ‘वनवासी’ म्हणून संबोधण्याच्या प्रवाहाबाबत त्यांनी आपले मत व्यक्त केले.

महिला प्रदेशाध्यक्ष नंदिनी टारपे यांनी आदिवासी समाजाच्या सामाजिक एकजुटीत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. फेब्रुवारी २०२७ मध्ये होणाऱ्या जनगणनेच्या पार्श्वभूमीवर स्वतंत्र आदिवासी ओळख व धर्म कोडच्या मागणीबाबत जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले.

माजी आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांनी सामाजिक, सांस्कृतिक व हक्कांच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. युवकांनी संघटित होऊन आदिवासी इतिहास व संस्कृतीची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी माजी आमदार संतोष टारपे, प्रदेशाध्यक्ष रामसाहेब चव्हाण, डी. बी. अंबुरे, सतीश पाचपुते, माधवराव वैद्य, प्रदेश सचिव शेषराव कोवे, अरुण कुमरे, वसंत कुडमिथे, गंगाधर गड्डमवाड, दिगंबर तारमिकवाड, अशोक नैताम, दादराव टेकाम,भारतजी हातमोडे, प्रदीप कुडमिथे, जितेंद्र कुलसंगे आदी उपस्थित होते.

परिषदेत आदिवासी समाजाच्या हिताचे तीन ठराव मांडण्यात आले. धर्म कोड, स्वतंत्र सांस्कृतिक व धार्मिक ओळख, परंपरांचे संरक्षण आणि जनगणनेतील स्वतंत्र धार्मिक नोंदीसाठी पुढील काळात जनजागृती व संघटनात्मक प्रयत्न सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय खुपसे यांनी केले. सूत्रसंचालन आदिवासी नेते गोपीनाथ बुलबुले यांनी केले, तर आभार डॉ. सुभाष वानोळे यांनी मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी किनवट परिसरातील विविध गावांमध्ये बैठका, जनजागृती व संपर्क अभियान राबविण्यात आले होते. या अभियानाला प्रतिसाद देत हजारो समाजबांधवांनी परिषदेला उपस्थिती लावली.

Related Articles

Back to top button