Uncategorized

आमदार भिमराव केराम यांच्या प्रयत्नांना यश; मारेगाव उच्च पातळी बंधाऱ्याला अंतिम मंजुरी

किनवट–माहूर विधानसभा ‘पाणीदार’ होण्याच्या दिशेने

▶ किनवट | प्रतिनिधी : किनवट परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणारी बातमी— पैनगंगा नदीवरील मारेगाव उच्च पातळी बंधारा प्रकल्पाला शासनाची अंतिम मंजुरी मिळाली आहे. आमदार भिमराव केराम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे मारेगाव, मलकापूर, खेडा, घोटी आणि किनवट या गावांचा दीर्घकाळाचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे.
प्रकल्पाची पाणी साठवण क्षमता ९.६९ दलघमी (Mm³) असून, एकूण १४५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. यामुळे आदिवासी व दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या शेतीला स्थैर्य मिळून त्यांचे उत्पन्न वाढण्यास हातभार लागेल.
या प्रकल्पाला गती देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंचनमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विशेष लक्ष दिले आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार, बंधाऱ्याचे काम एप्रिल २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
₹130.82 कोटी खर्चाच्या या प्रकल्पात १५४७ मीटर लांबीचे ११ दरवाजे प्रस्तावित असून, कामाची जबाबदारी उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागीय पथक क्र. ४ (आखाडा बाळापूर) येथील अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे.
गोदावरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तिरमनवार यांच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे प्रकल्पाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. या प्रकल्पामुळे किनवट–माहूर विधानसभा क्षेत्रात सिंचन, पिण्याचे पाणी आणि शेती विकासाचा नवा अध्याय सुरू होऊन हे क्षेत्र खऱ्या अर्थाने ‘बारमाही पाणीदार विधानसभा’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Related Articles

Back to top button