Uncategorized

अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अन्वेषण प्रस्ताव 5 मे पर्यंत सादर करण्याची अंतिम मुदत

नांदेड दि. 25 एप्रिल : सन 2011-12 ते 2017-18 तसेच महाडीबीटी प्रणालीवरील सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्यास 5 मे 2025 ही अंतिम मुदत आहे. यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयांचे प्रलंबित अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव निकाली काढण्यात येणार नाहीत. तसेच महाविद्यालयातील एकही मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती प्रलंबित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयांची राहील, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांनी केले आहे.

सन 2011-12 ते 2017-18 तसेच महाडीबीटी प्रणालीवरील सन 2018-19 ते 2023-24 या कालावधीतील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण 15.10.2024 च्या शासन निर्णयानुसार कळविण्यात आले होते. त्यानुसार महाडीबीटी प्रणाली मार्फत मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असली तरी पोर्टलवर अर्ज करतांना येणाऱ्या विविध अडचणीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत अर्ज भरूनही अर्ज Auto Reject होणे, एखाद्या वर्षी विद्यार्थ्यांच्या नियमित परीक्षा अथवा पुरवणी परीक्षेचा निकाल विहित वेळेत न लागल्याने अर्ज भरता न येणे अथवा अर्ज भरूनही पुढच्या वर्षीचा अर्ज नुतनीकरण करण्यास अडचण येणे. अशा बऱ्याच अडचणींचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे.

सन 2018-19 ते 2023-24 या वर्षात ज्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्जाची नोंदणी करण्यास अथवा नोंदणीकृत अर्ज मंजूर होण्यास अडचणी आल्या आहेत, अशा विद्यार्थ्यांना शासन निर्णयान्वये शिष्यवृत्ती ऑफलाईन पद्धतीने मंजूर करून अदा करण्यास राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुसार नांदेड जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, नांदेड येथे सादर केले होते. परंतु आर्थिक वर्ष 2024-25 संपून नवीन आर्थिक वर्ष 2025-26 सुरु झालेले आहे. त्यामुळे अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रलंबित शिष्यवृत्तीचे अन्वेषण प्रमाणपत्र प्रस्ताव 5 मे 2025 पर्यत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button