Uncategorized

पांदण रस्त्यांना गती; शेतकऱ्यांची वाट सुकर

प्रत्येक मंडळातील प्रमुख रस्त्यांना प्रथम प्राधान्य; आमदार भीमरावजी केराम यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

किनवट, दि. ९ : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता हाच शेतीच्या विकासाचा खरा मार्ग आहे. त्यामुळे मुख्यमंत्री बळीराजा शेत पांदण रस्ते योजनेतील कामांना गती देऊन ती कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश आमदार भीमरावजी केराम यांनी प्रशासनाला दिले.

किनवट–माहूर विधानसभा मतदारसंघातील पांदण रस्त्यांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालय, किनवट येथे बैठक घेण्यात आली. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी बी. सरवनन यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत किनवट व माहूर तालुक्यांतील सुरू, प्रस्तावित तसेच प्रलंबित कामांचा गावनिहाय आढावा घेण्यात आला.

प्रत्येक मंडळातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या प्रमुख पांदण रस्त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. प्रशासकीय, तांत्रिक अथवा अन्य कारणांमुळे रखडलेली कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचनाही आमदार केराम यांनी दिल्या.

पावसाळ्यात पांदण रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, बैलगाडी व अन्य शेतीची वाहने शेतापर्यंत नेण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी खते-बियाणे वाहतूक, शेतीची कामे तसेच शेतमाल बाजारपेठेत पोहोचविण्यावर परिणाम होतो.

“पांदण रस्त्यांची कामे कागदावर न राहता प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली पाहिजेत. शेतकऱ्याला चिखलातून वाट काढत शेतात जाण्याची वेळ येऊ नये,” अशी स्पष्ट भूमिका आमदार केराम यांनी मांडली.

कामांचा दर्जा व टिकाऊपणाबरोबरच शेतकऱ्यांना होणारा प्रत्यक्ष लाभ याला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. ‘शेत ते मुख्य रस्ता’ ही जोडणी मजबूत करून एकही गरजू शेतकरी पांदण रस्त्यापासून वंचित राहू नये, यासाठी प्रशासनाने गतिमान कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस पांदण रस्ता समितीचे सहअध्यक्ष बाबुराव केंदे, तहसीलदार डॉ. शारदा चौडेकर, माहूर तहसीलदार अभिजित जगताप, पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, कृषी व भूमी अभिलेख विभागाचे अधिकारी तसेच समिती सदस्य कांतराव घोडेकर, विलास चौधरी, जगदीश नलमेलवार, सागर पिसारीवार, एस. के. नेम्मानीवार, श्रीनिवास यादवराव नेम्मानीवार यांच्यासह संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button