रेणुकादेवीच्या चरणी कोटींची भक्ती
डिसेंबर २०२५ मध्ये श्री रेणुकादेवी संस्थानला १.१४ कोटींचे विक्रमी उत्पन्न ४.४११ किलो चांदी व ११८ ग्रॅम सोने दान स्वरूपात प्राप्त

किनवट प्रतिनिधी :महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण शक्तीपीठ म्हणून ओळख असलेल्या माहूरगडावरील श्री रेणुकादेवी संस्थानसाठी डिसेंबर २०२५ हा महिना विक्रमी ठरला आहे. या कालावधीत संस्थानला एकूण १ कोटी १४ लाख २० हजार ८९९ रुपये रोख उत्पन्न, तसेच ४ किलो ४११ ग्रॅम ७८० मिली चांदी व ११८ ग्रॅम सोने दान स्वरूपात प्राप्त झाले आहे.
बुधवार, ७ जानेवारी २०२६ रोजी संस्थानच्या कार्यालयात एकूण ११ दानपेट्यांची मोजदाद पारदर्शक पद्धतीने व व्हिडीओ चित्रीकरणात करण्यात आली. दानपेट्यांतून २५ लाख ३२ हजार ३९८ रुपये रोख, ९६ ग्रॅम ५०० मिली सोने, सोन्याच्या ४७ नथा तसेच २ किलो २१० ग्रॅम चांदीचे दागिने प्राप्त झाले.
डिसेंबर महिन्यात दर्शन व इतर काउंटरमधून ३८ लाख ५१ हजार २२४ रुपये, ऑनलाईन देणगीतून २६ लाख २ हजार ७४७ रुपये, तर साडी–पातळ विक्रीतून ५३० रुपये उत्पन्न मिळाले.
नाताळच्या सुट्ट्या, वर्षअखेरीस व नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर देशभरातून लाखो भाविकांनी माहूरगडावर दर्शनासाठी हजेरी लावल्याने संस्थानच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
या मोजदादीवेळी तहसीलदार अभिजीत जगताप, संस्थानचे विश्वस्त चंद्रकांत भोपी, संजय कान्नव, दुर्गादास भोपी, बालाजी जगत, संस्थान व्यवस्थापक योगेश साबळे व सहाय्यक व्यवस्थापक नितीन गेडाम उपस्थित होते.
संस्थानला मिळालेल्या या विक्रमी उत्पन्नातून भाविकांच्या सोयीसुविधा, दर्शन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा व विकासकामांना अधिक गती देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.



