ताडोबाच्या धर्तीवर दिवसा वीज पुरवठा करा : आमदार भीमराव केराम
दिवसा वीजपुरवठा : किनवटच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेची तातडीची गरज

किनवट (जि. नांदेड) प्रतिनिधी : आदिवासी बहुल व डोंगराळ भाग असलेल्या किनवट तालुक्यात वाढत्या वन्यप्राण्यांच्या वावरामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनप्रमाणेच किनवट तालुक्यातील कृषी पंपांना प्राधान्याने दिवसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे.
किनवट तालुका पैनगंगा अभयारण्य, तेलंगणातील कावल टायगर रिझर्व्ह आणि यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्य यांच्या त्रिकोणी वनक्षेत्राने वेढलेला आहे. या कारणामुळे परिसरात वन्यप्राण्यांचा मोठ्या प्रमाणात वावर असून, रात्रीच्या वेळी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे.
दरम्यान, तालुक्यातील दयाळ धानोरा येथे १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हिंस्र अस्वलाने नऊ शेतकऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेत दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून शेतकरी रात्री शेतात जाण्यास धजावत नाहीत.
तालुका तिन्ही बाजूंनी अभयारण्यांनी वेढलेला असल्याने शेतकऱ्यांचा जीव धोक्यात घालून रात्री वीजपुरवठा करणे अन्यायकारक असल्याचे आमदार केराम यांनी नमूद केले आहे. यासंदर्भात लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कृषी पंपांना चोवीस तास किंवा किमान दिवसा वीजपुरवठा देण्याची मागणी लावून धरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती, मूल, सावली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्यांत वन्यप्राणी-मानव संघर्ष टाळण्यासाठी कृषी पंपांना दिवसा वीज दिली जाते. त्याच धर्तीवर किनवटच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.



