विशेष लोकअदालतीचे 21 नोव्हेंबरला आयोजन
प्रलंबित तसेच दाखलपूर्व प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याची संधी; पक्षकारांनी लाभ घेण्याचे आवाहन

नांदेड, दि. 30 : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नरेंद्र के. ब्रह्मे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये 21 नोव्हेंबर 2026 रोजी विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या विशेष लोकअदालतीमध्ये परक्राम्य लेख अधिनियम, 1881 च्या कलम 138 अंतर्गत धनादेश अनादर (चेक बाऊन्स) संदर्भातील पात्र प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात येणार आहेत.
या अनुषंगाने संबंधित पक्षकारांना आपली प्रकरणे तडजोडीने मिटविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणांसाठी संबंधित न्यायालयात, तर दाखलपूर्व प्रकरणांसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड किंवा जवळच्या तालुका न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून तडजोड करता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नांदेड किंवा जवळच्या न्यायालयातील तालुका विधी सेवा समितीशी संपर्क साधावा.
या विशेष लोकअदालतीचा संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शरद देशपांडे यांनी केले आहे.
*******



