Uncategorized

किनवट-माहूरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचे प्रचंड नुकसान; “ओला दुष्काळ” जाहीर करा – आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

किनवट ता. १३ : मॉन्सून हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार भीमराव केराम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन स्वरूपात पत्र पाठवून किनवट व माहूर तालुके “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करण्याची मागणी केली आहे.

आमदार केराम यांनी पत्रात म्हटले आहे की, 1 जून ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत नांदेड जिल्ह्यात सरासरी 658 मिमी पावसाच्या तुलनेत तब्बल 820 मिमी पाऊस झाला आहे, म्हणजेच 24.6टक्के अधिक. विशेषतः किनवट व माहूर या डोंगराळ व वनक्षेत्रीय तालुक्यांमध्ये सरासरीपेक्षा 78 ते 82 टक्के अधिक पर्जन्यमान नोंदवले गेले आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत ही टक्केवारी 100 पेक्षा जास्त होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची खरीप पिके पूर्णपणे उध्वस्त झाली असून मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या परिस्थितीत राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना मदत करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार केराम यांनी स्पष्ट केले आहे.

किनवट व माहूर तालुक्यांना “ओला दुष्काळग्रस्त” घोषित करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, पिकनुकसान भरपाई, कर्जमाफी किंवा अनुदानाचा समावेश असलेले विशेष पॅकेज तातडीने लागू करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. तसेच जिल्हा प्रशासनाला याबाबत आवश्यक निर्देश देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे करण्यात आले आहे.

किनवट-माहूर तालुक्यातील शेतकरी आता सरकारच्या निर्णयाकडे आशेने डोळे लावून आहेत.

Related Articles

Back to top button