Uncategorized

इस्लापूरच्या वीज समस्यांवर शेतकरी संघटना आक्रमक

१५ ऑक्टोबरपर्यंत तोडगा काढा; अन्यथा १६ पासून आमरण उपोषणाचा इशारा

इस्लापूर : कृषी पंपांचा अनियमित वीजपुरवठा, गावठाणातील वारंवार वीजखंडित होणे आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची कमतरता यांसह विविध समस्यांवरून शेतकरी संघटनेने महावितरणविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत प्रश्न सोडवावेत; अन्यथा १६ ऑक्टोबरपासून महावितरणच्या इस्लापूर शाखा कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असे निवेदनाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

शेतकरी संघटनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन दिले. यात कृषी पंपांना निर्धारित वेळापत्रकानुसार वीजपुरवठा करणे, गावठाणचा वीजपुरवठा सुरळीत ठेवणे, आवश्यक तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आणि वीजविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची मागणी करण्यात आली.

काही वीजविषयक कामांसाठी ग्राहकांकडून ५०० रुपयांपर्यंत अनधिकृत पैशांची मागणी होत असल्याच्या तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही संघटनेने केली आहे. मागील वर्षभरापासून पाठपुरावा करूनही समस्यांचे निराकरण झाले नसल्याने शेतकरी व नागरिकांमध्ये नाराजी असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.

१५ ऑक्टोबरपूर्वी अधिकाऱ्यांनी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन समस्यांवर कालबद्ध तोडगा काढावा, अन्यथा आंदोलन सुरू करण्यात येईल, असा इशारा रमेश कदम पाटील, सुरेश करेवाड, गुलाबराव हराळे, देवराव केशवराव पाटील, नागोराव केशवराव हराळे आणि विनायक माधव टारपे यांनी दिला.

फोटो कॅप्शन : इस्लापूर सर्कलमधील वीज समस्यांबाबत महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यांना निवेदन देताना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश कदम पाटील व पदाधिकारी.

Related Articles

Back to top button