बनावट खतांसह 5 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कृषी विभागाच्या पथकाची तालुक्यातील दुसरी कारवाई

किनवट,दि.06(प्रतिनिधी) : तालुक्यातील तल्हारी शिवारात एका चारचाकी वाहनातून शेतकऱ्यांना बोगस पोटॅश या खताची विक्री होत असतांना, पं.स.चे कृषी अधिकारी शिवराम मुंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सदरील ठिकाणी धाड टाकून चारचाकी वाहनासह 41 बॅग खत असा एकूण 5 लाख 56 हजार 990 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना बुधवारी (दि.05) रात्री 10.30 च्या सुमारास घडली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार, गुणवत्ता व गुणनियंत्रण निरीक्षक तथा पं.स.चे कृषी अधिकारी शिवराम मुंडे यांना तालुक्यातील तल्हारी या गावच्या शिवारात एका चारचाकी वाहनातून संशयास्पदरित्या शेतकऱ्यांना पोटॅश या खताची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून त्यांनी तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे, इस्लापूरचे कृषी पर्यवेक्षक शिवाजी जाधव, बोधडीचे कृ्.प. बाळासाहेब ठेंगे, कृषी सहाय्यक गजानन गोरे, धर्मेश पोगुलवार, सुनीता चापरे व रेणुका बुलबुले यांच्या समवेत घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एका पांढऱ्या रंगाच्या महिंद्रा मॅक्स पिकअप कंपनीच्या एम.एच.14 एच.यू. 8563 क्रमांकाच्या वाहनातून कृषी भारती फर्टिलायझर इंडस्ट्रिज या कंपनीच्या बॅगवर पीआरओएम (‘पोटॅश रिच आर्गनिक मन्युअर’) या नावाचे बोगस पोटॅश खताची विक्री होत असतांना आढळून आले. सदरील विक्री करणारे सुभाष बाळाराम राठोड रा. उमरहिरा तांडा, पो. पवना ता.हिमायतनगर जि. नांदेड यांच्याकडे उगम प्रमाणपत्र, खत विक्री परवाना, कंपनीच्या जबाबदार व्यक्तींचा नाव,पत्ता आदी कागदपत्रांची मागणी केली असता, त्यांनी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे सांगितले. त्यावरून या संशयास्पद ठरलेल्या या सेंद्रीय खताचा नमुना घेऊन ते छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत विश्लेषणार्थ पाठविण्यात आले. दरम्यान, वाहनात आढळलेले 41 बॅग ज्याची किंमत 1,390 प्रति बॅग प्रमाणे 56 हजार 990 रुपये किंमतीचे खत आणि अंदाजे पाच लाख रुपये किंमतीचे वाहन मिळून एकूण 5 लाख 56 हजार 990 रुपये किंमतीचा मुद्देमाल साक्षीदारासमक्ष पंचनामा करून जप्त करण्यात आला. त्यानंतर सदरील माल व वाहन इस्लापूर पो.स्टे.ला नेऊन, कृ.अ.शिवराम मुंडे यांनी फिर्याद दिल्यानंतर जमा करण्यात आला व रात्री अकराच्या नंतर या खत विक्री करणाऱ्या या आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किनवट तालुक्यात दुसऱ्यांदा बनावट खताचा साठा जप्त करण्याच्या कारवाईवरून तालुक्यातील बोगस बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशके यांची छुपी विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.


