धनादेश न वठत्याने कर्जदारास ३ महिन्याच्या शिक्षेसह दंड
किनवट – येथील जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्था किनवट यांनी दिलेल्या कर्जाच्या परताव्यापोटी कर्जदाराने दिलेला धनादेश वठला नसल्याने येथील दिवाणी न्यायालयाने कर्जदारास ३ महिन्याच्या साध्या शिक्षेसह ९३ हजार ५०४ रुपयांचा दंड ठोठावला आहे. किनवटच्या जनकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेकडून नरसिंग मधुकर मुपकलवार यांनी कर्ज घेतले होते.कर्जाची मुदत संपल्यानंतरही मुपकलवार यांनी रक्कम भरणा केली नाही. यामुळे पतसंस्थेचे व्यवस्थापक सुरेश पवार यांनी कर्जदारास नोटीस दिली.त्यानंतर कर्जदार मुपकलवार यांनी घेतलेल्या कर्जापोटी पतसंस्थेला धनादेश दिला.परंतु,त्यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने सदर धनादेश वठला नाही.याप्रकरणी पतसंस्थेने किनवटच्चा दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल केले.न्या. पी. एम. माने यांच्या न्यायदालनात याप्रकरणाची सुनावणी झाली.न्या.माने यांनी दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून मुपकलवार यांनी दिलेला धनादेश न वठल्याने नरसिंग मुपकलवार यांना ३ महिन्याची साधी कैद तसेच फिर्यादी पतसंस्थेस नुकसानभरपाई म्हणून ९३ हजार ५०४ रुपये देण्याचा आदेश दिला.याप्रकरणात पतसंस्थेची बाजू अॅड.दिलीप काळे यांनी मांडली.


