किनवट

नगरपालिकेने मालमत्ताधारकांना कराची पावती संगणकीय द्यावी – ॲड. सम्राट सर्पे

किनवट,दि.12 ( प्रतिनिधी ) : डिजिटल इंडिया होत असताना आजही किनवट नगरपालिकेकडून मालमत्ताधारकांना घर कर, पाणी कर आणि इतर टॅक्सची पावती जीर्ण झालेल्या छापील कागदावर हाताने लिहून दिल्या जात आहे. परिणामी मालमत्ता धारकांना ती पावती सांभाळून ठेवायची जोखीम घ्यावी लागत असल्यामुळे त्यांची कुचंबणा टाळण्यासाठी संगणकीय पावती द्यावी, अशी मागणी ॲड.सम्राट सर्पे यांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे.

निवेदनात म्हटले की, किनवट शहरातील मालमत्ता धारकांना वर्षानुवर्षे टॅक्स पावत्या सांभाळून ठेवणे गरजेचे झाले आहे. कारण कर भरल्यानंतर नोंद घेतल्या जाणाऱ्या रजिस्टरवर हव्या तशा नोंदी घेतल्या जातात. जास्तीचे कर लिहून पुन्हा त्यात खडाखोड झाल्याचा प्रकारही मागे चर्चिला गेला होता. कर भरूनही पालिकेच्या रजिस्टरमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्याकडून चुकून नोंदणी न केली गेल्यास, मालमत्ताधारकाने कर भरल्याची पावती दाखविली तरच दुरुस्ती केली जाते. त्यामुळे पावती जपून ठेवणे हे जरूरीचे झाले आहे. त्यामुळे अनेक नागरिक संगणकीय नोंद करून पावती का दिली जात नाही? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. त्यामुळे यावर आळा बसायचा असेल तर संगणकीय कर पावत्या द्याव्यात आणि रजिस्टर वर नोंद न ठेवता संगणकीय नोंदी ठेवाव्यात यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि मालमत्ता धारकांची गैरसोय होणार नाही, अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते ॲड. सम्राट मिलिंद सर्पे यांनी किनवट पालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

Related Articles

Back to top button