
किनवट – किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघात ७१.९५ टक्के मतदान झाले.यात १ लाख ४ हजार १५४ पुरुष,९६ हजार ३४२ महिला, तर इतर तिघांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानानंतर पैजांना ऊत आला असून,कोण कसे विजयी होणार,याची आकडेमोड सुरु आहे. बुधवारी दि.२० सकाळी ७ वाजल्यापासून किनवट व माहूर तालुक्यातील एकूण ३३१ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया सुरू झाली.थंडीमुळे सकाळी १० वाजेपर्यंत मतदान संथगतीने सुरू होते.त्यानंतर सर्वच केंद्रांत मतदानाला गती आली.विविध राजकीय पक्षांनी मतदान वाढीसाठी मतदारांना आणण्यासाठी वाहनांची सोय केली होती.सायंकाळी ४ नंतर विविध केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.किनवट – माहूर तालुक्यातील दुर्गम,पहाडी भागांतील मतदानाची टक्केवारी मिळण्यास उशीर झाला.मतदारसंघात १ लाख ४२ हजार २७३ पुरुष, १ लाख ३६ हजार ३८१ महिला, तर इतर ११ असे २ लाख ७८ हजार ६६५ मतदार आहेत.मतदारसंघात वेगवेगळ्या राजकीय पक्षांसह अपक्ष असे एकूण १७ उमेदवार रिंगणात होते.झालेल्या मतदानात १ लाख ४ हजार १५४ पुरुष,९६ हजार ३४२ महिला व ३ इतर अशा २ लाख ४९९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.मतदानप्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी मेघना कावली,किनवटच्या तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा चौंडेकर,माहूरचे तहसीलदार किशोर यादव,किनवट पालिकेचे मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांच्यासह महसूल,पालिका व पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.शनिवारी दि.२३ सकाळी ८ वाजेपासून नांदेड रस्त्यावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत मतमोजणीला सुरुवात होणार आहे.


