अतिवृष्टीची मदत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी तत्काळ ई-केवायसी करून घ्यावी – तहसीलदार शारदा चौंडेकर

किनवट,दि.02(प्रतिनिधी) : किनवट तालुक्यात गत दोन वर्षातील विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची मदत मिळविण्यासाठी गावातील तलाठ्याकडून विशिष्ट क्रमांक मिळवून घेत ई-केवायसी करून घेणे अनिवार्य असून, शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी अविलंब पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी केले आहे.
सप्टेबर-ऑक्टोबर 2022 मध्ये झालेली अतिवृष्टी, मार्च-एप्रिल 2023 मध्ये झालेली गारपीट व अवकाळी पाऊस, यानंतर जून-जुलै 2023 मधील अतिवृष्टी आणि नोव्हेंबर 2023 मध्ये झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहायक यांची त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. या त्रिस्तरीय समितीमार्फत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण 5 लाख 14 हजार 183 शेतकऱ्यांना 415 कोटी रुपयांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठीची मान्यता शासनाकडून देण्यात आली आहे. त्यापैकी जिल्ह्यातील 66 हजार 339 शेतकऱ्यांनी ई-केवायसी न केल्यामुळे तब्बल 42 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा निधी जिल्ह्यात वितरित न होता प्रलंबित आहे.
यासाठी शेतकऱ्यांकडून विशिष्ट क्रमांकासह लवकरात लवकर ई-केवायसी करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी सर्व तहसीलदारांना दिले आहेत. त्या अनुषंगाने मदत व पुनर्वसन मंत्रालय मुंबई यांच्याकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयान्वये बाधित शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम वितरीत करण्याबाबत शासनाच्या पोर्टलवरून यादी अपलोड करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. ही यादी अपलोड केल्यानंतर बाधित शेतकऱ्यांना आपल्या गावातील तलाठ्याकडून आपल्या स्वत:चा ‘विशिष्ट क्रमांक’ घेऊन ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. त्याबाबत सर्व तहसील कार्यालयाकडून तलाठ्यांमार्फत जाणीवपूर्वक भरसक प्रयत्न करण्यात येत असून, ज्या बाधित शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केली नाही. अशा शेतक-यांनी तात्काळ जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन ती करून घ्यावी; अन्यथा आपल्या आधार लिंक खात्यावर अनुदान जमा होणार नाही, असे तहसीलदार शारदा चौंडेकर यांनी कळविले आहे.
किनवट तालुक्यातील एकूण 07 हजार 191 शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित होती. या सर्वांना ई-केवायसी करून घेण्याबाबत मोबाईलवर मॅसेज पाठविण्यात आला असून, त्यापैकी आजपर्यंत एकूण 03 हजार 022 शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी करून घेतलेली आहे. 04 हजार 169 शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे अजून बाकी आहे. शहरातील सर्व सेतू सुविधा केंद्रावर ई-केवायसी करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी झालेली असून, त्यात अपलोड केली जाणारी साईट ही अधूनमधून बंद पडत असल्यामुळे अधिक विलंब होत असल्याचे सेतूसुविधा चालकांनी सांगितले.


