हाऊसिंग सोसायटीच्या मोकळ्या जागेवरील अतिक्रमण व अवैध बांधकाम निष्कासित करण्याची मागणी
किनवट,दि.28 (प्रतिनिधी) : शहरातील संजय गांधी एसटी कर्मचारी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या मोकळ्या भूखंडावर झालेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम निष्कासित करून, ती जागा पालिकेच्या ताब्यात घेण्यासंबंधीचे निवेदन येथील सामाजिक कार्यकर्ते बाबूराव ओद्दीवार यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले की, शहरातील संजय गांधी एसटी कर्मचारी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. ची मोकळी जागा ही सर्वे नं. 244 मधील असून, यावर सर्वे नं.245 व 246 मधील लागतधारकांनी अतिक्रमण करून बेकायदेशीर बांधकाम केले आहे आणि काही जण आताही करीत आहेत. त्यामुळे पालिकेने या प्रकरणात तत्काळ हस्तक्षेप करून न.प. मालकीच्या जागेवर होत असलेले अतिक्रमण व अनधिकृत बांधकाम त्वरित थांबवावे. सोबतच भूमीअभिलेख, कार्यालय, किनवट येथून आपल्या मार्फत दोन्ही लागतधारकांच्या सर्वे नंबरची हद्द निश्चित केल्यानंतरच सर्वे नं. 245 व 246 या दोन्ही लागतधारकांना बांधकाम परवानगी द्यावी. न.प.च्या सर्वे नं. 244 वरील मोकळ्या जागेभोवताली तारेचे कुंपण उभारून पालिकेच्या मालकीचा फलक लावण्यात यावा; अन्यथा अवैध भूखंडधारक नगर परिषदेची एकही जागा मोकळी सोडणार नाहीत, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
किनवट शहरात नगर परिषद मालकीची बरीच मोकळी जागा असून, अशा मोकळ्या जागेवर काही अवैध भूखंडधारकांनी अतिक्रमण केले आहे. दिवसेंदिवस पालिकेच्या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. असेच प्रकार राजरोस चालू राहील्यास भविष्यात नगर परिषद मालकीची एकही जागा पालिकेच्या उपयोगासाठी शिल्लकच राहणार नाही. त्यामुळे आपण जातीने लक्ष घालून संजय गांधी एसटी कर्मचारी को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या मोकळ्या जागेवर झालेले अतिक्रमण व अवैध बांधकाम ताबतडतोब निष्कासित करून आपली जागा ताब्यात घेऊन, पुढील अनर्थ टाळावा, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त, छ. संभाजीनगर, जिल्हाधिकारी नांदेड, सहा.जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी व तहसीलदार किनवट यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.


