किनवट

विशाळगड प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करा येथील ‘एआईएमआईएम’ कडून मागणी

किनवट,दि.20(प्रतिनिधी) : विशाळगडवर हिंसाचार करणा‌ऱ्या दंगेखोरांवर कठोर कारवाई करून, हिंसाचार, दगडफेक,जाळपोळमध्ये नुकसान झालेल्या निष्पाप लोकांना शासनाकडून तत्काळ आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी येथील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीन (एआईएमआईएम) चे तालुकाध्यक्ष काझी शफियोद्दीन करीमोद्दीन यांनी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन केली आहे.
निवेदनात म्हटले की, अतिक्रमण मुक्त विशाळगड मोहिमेला हिंसक वळण देऊन दंगे खोरानी मलिक रेहान दर्गा व मस्जिदजवळ घोषणा देत दगडफेक केली. खरंतर पुरोगामी महाराष्ट्रामध्ये ही घटना शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांच्या विचारांना काळीमा फासणारी आहे.  छत्रपती शिवाजी महाराजांनी 1659 मध्ये विशाळगड जिंकून घेतला होता. म्हणजेच जवळपास 43 वर्ष मराठ्यांची विशाळगडावर सत्ता होती; मात्र त्या काळात छत्रपती शिवरायांनी मलिक रेहान दर्गा व मस्जिद या वास्तूच्या मूळ स्वरुपाला धक्का लावला नव्हता. म्हणजेच या वास्तू 1659 च्या आधीपासून अस्तित्वात होत्या. हा इतिहास शिवप्रेमींनी विसरू नये. विशाल गडावरील हिंसाचार घटनेचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आणखी तणाव निर्माण आला आहे. विशालगडच्या पायथ्याशी असलेले गजापूर गावात प्रक्षुब्ध जमावाने दगडफेक, जाळपोळ केली. यामध्ये अनेक घरे, वाहने जळून खाक झालीत. विशेष म्हणजे अतिक्रमणाशी या गावाचा कुठलाही संबंध नव्हता. विशेष करून तेथील अल्पसंख्यांक समाजाला टार्गेट करून हिंसा घडवण्यात आली आहे. विशाळगड अतिक्रमण प्रकरण हे कोर्टात न्यायप्रविष्ट आहे, अतिक्रमणविरोधी मोहिमेत कायदेशीर प्रक्रिया पाळली जात नाही. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही; म्हणून सदरील प्रकरणाची सखोल चौकशी करून जाळपोळमध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई तात्काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावी व संबंधित दंगेखोरांवर कायदेशीर कारवाई करून दंगेखोरांना अटक करण्यात यावी. आणि महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक व महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना पाठविण्यात आलेल्या आहेत.  निवेदन देतांना माजी नगरसेवक इम्रानखान इसाखान, फहीम कुरेशी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button