डीआरएम’ समोर किनवटकरांनी वाचला समस्यांचा पाढा !

किनवट : दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय रेल व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांनी किनवट रेल्वे स्थानकाला २२ जून रोजी भेट दिली. यावेळी किनवटकरांनी समस्यांचा पाढा वाचला. आजपर्यंत एकही मागणी पदरात पडली नाही. त्यामुळे या दौऱ्यात केलेल्या एक तरी मागणीची पूर्तता होईल का? अशी चर्चा ऐकावयास मिळत होती.
नांदेड रेल्वे विभागाच्या विभागीय रेल व्यवस्थापक नीती सरकार व त्यांच्या टीमने पावसाळ्याच्या सुरुवातीला आदिलाबाद ते नांदेड मार्गावर असलेल्या किनवट रेल्वे स्टेशनच्या तांत्रिक तपासणीसाठी शनिवारी सायंकाळी भेट दिली. माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानीवार, के. मूर्ती व पत्रकार रेल्वे स्टेशन येथेधडकले. तेथे त्यांची भेट घेऊन प्रवाशांना मनस्ताप देणाऱ्या आदिलाबाद ते नांदेड इंटरसिटीच्या उशिरा धावण्याची तर कधी ऐनवेळी रद्द होण्याची समस्या मांडली. तिरुपती ते आदिलाबाद कृष्णा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्याने भाविकांची मोठी गैरसोय होत आहे.
आसन व्यवस्था बरोबर नसलेल्या परळी, आदिलाबाद डेमू गाडीऐवजी पूर्वीप्रमाणे डबे असलेली गाडी सोडावी व डबे वाढवावे, किनवट रेल्वे स्थानकावर साफसफाईची समस्या, मोकाट जनावरांची समस्या, जनरल प्रवाशांसाठी असलेल्या प्रतीक्षालय, पिण्याचे पाणी मिळेना अशा बाबी निदर्शनास आणून दिल्या. वर्षभरापूर्वी रेल्वे स्टेशन कमान ते रेल्वे स्टेशन असे झालेले डांबरीकरणाचे काम उखडून गेल्याची बाब निदर्शनास आणून दिली.


