किनवट

अप्पारावपेठ येथील अंगणवाडीत वाटप केलेला पोषण आहार निकृष्ट दर्जाचा लाभार्थ्यांनी केली सर्व पाकीटे परत

किनवट,दि.01 (प्रतिनिधी) : तालुक्यातील अप्पारावपेठ येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये लहान मुलांसह गरोदर व स्तनदा मातांना देण्यात आलेल्या पोषण आहार जाळी धरलेले दुर्गंधीयुक्त असून पाकीटात लहान कीडे आढळल्याने  संतापलेल्या पालकांनी हा आहार अंगणवाडीत परत केला. असा निकृष्ट आहार  खाल्ल्यानंतर जर माता व बालकांचे आरोग्य धोक्यात आले तर त्यास जबाबदार कोण? असा संतप्त सवाल तेथील नागरिकांनी केला आहे.  

महाराष्ट्र शासनाकडून राज्यातील सर्वच अंगणवाड्यातील सहा महिने ते तीन वर्ष सर्वसाधारण बालके व सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील तीव्र कमी वजनाच्या बालकांसाठी तसेच गरोदर माता आणि स्तनदा मातांसाठी महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेकडून हा पोषण आहार पुरविला जातो.

महाराष्ट्र व तेलंगणा सीमेलगत असलेल्या अप्पारावपेठ येथील अंगणवाडी क्रमांक दोन मध्ये 27 जून 2024 रोजी जस्ट युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेड कडून वाहन क्रमांक एम. एच. 14 / 0650 या द्वारे एनर्जी डेन्स मुगदाळ खिचडी प्रिमिक्स 48 पाकीट, एनर्जी डेन्स जोरदार खिचडी प्रिमिक्स 48 पाकीट, मल्टी मिक्स सिरीयल्स अँड प्रोटीन्स प्रिमिक्स 48 पाकीट असे एकूण पोषण आहाराचे 144 पाकीटे दोन गरोदर माता, दोन स्तनंदा माता  आणि सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील सर्वसाधारण बालके व तीन ते सहा वर्ष तीव्र कमी वजनाच्या 20 बालकांसाठी हा पोषण आहार  अंगणवाडीत देण्यात आला होता. मात्र, घरी  लाभार्थ्यांनी सदरील आहाराची पाकीटे फोडल्यानंतर त्यातील आहार जाळी धरलेले दुर्गंधीयुक्त असलेले दिसले, शिवाय बऱ्याच पाकिटात बारीक किडेही आढळल्याचे तेथील नागरिकांनी म्हणणे आहे. त्या नंतर सर्व लाभार्थ्यानी प्राप्त पोषण आहाराची पाकीटे अंगणवाडीत परत केल्याचे समजते. इतका निकृष्ट दर्जाचा पोषण आहार लहान बालकांसाठी पुरवला जात असल्यामुळे ऐन पावसाळ्यात बालकांचे व गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, त्यामुळे असा सदोष पोषण आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराची चौकशी होणे आवश्यक असून, शासन व प्रशासनाने चांगल्या दर्जाचा पोषण आहार द्यावा, अशी मागणी  अप्पारावपेठ येथील कौड येरन्ना, कौड योगेश, विलास सटललू, नूतुला भूमेश, मच्छर्ला दिलीप, कडतला लक्ष्मण आदी पालकांनी केली आहे.

Related Articles

Back to top button