किनवट

तीव्र उन्हामुळे मशागतीची कामे खोळंबली

किनवट,दि.03(प्रतिनिधी) : तालुक्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. त्याचा परिणाम शेतीकामांवर होताना दिसत आहे. शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी उन्हाच्या चटक्यांमुळे कामाची पद्धत बदलली आहे. सकाळी लवकर व सायंकाळी उशिरापर्यंत काम करत, दुपारी कडक उन्हाच्या काळात काम करणे टाळले जात असल्यामुळे, शेत मशागतीची कामेही खोळंबली आहेत.
         तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने वातावरण बदल होत आहे. दीड महिन्यात सुमारे सात ते आठ वेळा जोरदार वादळ, पाऊस, गारपीट झाली. ऊन, ढगाळ वातावरण तर सततच होते. त्यामुळे भूईमूग,तीळ,ज्वारी आदी उन्हाळी पिके, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले. गेल्या पाच-सहा दिवसांपासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे.
सध्या सूर्य आग ओकत असून, ४१ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान आहे. त्यामुळे सकाळी नऊ वाजताच उन्हाची तीव्रता जाणवते. सध्या उन्हाळी ज्वारी व मका काढणीचे काम वेगाने सुरू आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेचा शेतीकामांवर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
सकाळी दहा ते सायंकाळी पाच-साडेपाच अशी मजुरांची कामाची वेळ असते. सध्या मात्र सकाळी उन्हाची तीव्रता जाणवत असल्याने सकाळी सात वाजता कामांवर येऊन सायंकाळी उशिरापर्यंत काम करायचे आणि दुपारी उन्हाच्या अधिक तीव्रतेच्या वेळी काम टाळायचे असे सुरू आहे तर काही ठिकाणी सकाळी सात ते दुपारी दोन पर्यंत काम करून घरी परतणे सुरू आहे

Related Articles

Back to top button