किनवट

अस्वलाच्या हल्ल्यात शेतमजूर गंभीर जखमी

किनवट,दि.25 (प्रतिनिधी) :  तालुक्यातील मोहपूर येथे जंगली अस्वलाने केलेल्या जबर हल्ल्यात एक शेतमजूर गंभीररित्या जखमी झाला आहे. ही घटना आज गुरूवारी (दि.25) सकाळी आठ च्या सुमारास घडली असून, वनविभागाने सदर प्रकरणी चौकशी करून जखमीस उपचारार्थ 20 हजार  रुपयांची    तातडीची आर्थिक मदत दिली आहे.

 वनविभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मोहपूर निवासी  शंकर  मधुकर आमले (वय 35 वर्षे) हा शेतमजूर गुरूवारी सकाळी सात वाजता लगतच्या सिंदगी शिवारातील शेतात काम करण्यासाठी मजूरीने गेला होता. शेतात काम करतांना एका झुडूपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्याच्यावर हल्ला करून त्याच्या चेहऱ्याला पंज्याने ओरबाडीत व चावा घेत त्यास गंभीर जखमी केले. त्यात त्याचा डोळाही निकामी होण्याची शक्यता असल्याची चर्चा होती. त्याच्या किंकाळ्यामुळे आजूबाजूची माणसे धावत आल्याने ते अस्वल जंगलाच्या दिशेने पळून गेले. जखमी  शंकर   यास प्रथम गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचारासाठी दाखल केले होते. मात्र, त्याची गंभीर अवस्था पाहता त्याला शेजारच्या तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे पुढील उपचारार्थ पाठविण्यात आले.

   ही खबर वनविभागास मिळाल्याबरोबर सहा.वनसंरक्षक जी.डी.गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.)पी.एल.राठोड यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी व चौकशी करून जखमीची रुग्णालयात भेट घेतली. परिस्थितीचे गांभीर्य पाहून त्यास पुढील उपचारार्थ वनविभागातर्फे तातडीची 20 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.  यावेळी निचपूरचे वनपाल जी. टी. माझळकर, वनरक्षक चांगुना बुरकुले, रवी दांडेगावकर, बालाजी झंपलवाड, कुंदन दांडेगावकर, वनमजूर हुसेन पठाण आदींची उपस्थिती होती. किनवट तालुक्यात जंगलव्याप्त क्षेत्र खूप जास्त असल्यामुळे, जंगलालगतच्या भागात नेहमीच वन्यप्राण्यांशी सामना होत असतो. त्यामुळे मानवीवस्ती असलेल्या जंगलाजवळचा भाग वनविभागाने तारकुंपणाद्वारे संरक्षित केल्यास, अशा घटनांना थोडाबहुत चाप बसेल, अशी ग्रामस्थांत चर्चा होती.

Related Articles

Back to top button