लाडकी बहीण योजनेमुळे इतर व्यवसायात वृद्धी
किनवट,दि.24(प्रतिनिधी) : ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ ही योजना जाहीर झाल्यापासून ग्रामीण महिला शेतीचा कामधंदा सोडून या योजनेकरिता लागणारी कागदपत्रे जमा करण्यातच व्यस्त आहेत. त्यांच्याबरोबर कारभाऱ्यांना सुद्धा त्यांनी कागदपत्रांच्या जुळवणीसाठी कामाला लावले असून, या लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने इतर व्यवसायातमध्ये वृद्धी झालेली आहे.
जिथं बघावं तिथं महिला हातात कागद घेऊन वणवण फिरताना दिसून येत आहेत. गावातून पोलीस पाटील, सरपंच यांची सही घेतली की थेट तहसीलकडे मोर्चा वळवीत असल्याने, एस.टी. व खासगी वाहतुकीला गर्दी होत असून, खासगी वाहनधारकांचा व्यवसाय तेजीत आहे. त्याचबरोबर झेरॉक्स सेंटरला तर सुगीचे दिवस आले आहेत. दलालांचही यामुळे चांगलंच फावले आहे. हॉटेल, फळविक्रेते यांच्या व्यवसायातही वृद्धी झालेली आहे.
सध्या शेतीकामाची लगबग सुरू आहे. कापूसाची खुरपणी, खत टाकणे आदी कामे सुरू आहेत; परंतु ही योजना सुरू झाली तेव्हापासून मजूर वर्ग याच कामात व्यस्त असल्याने, शेतीकामासाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे. डोमोसाईल, उत्पन्नाचा दाखला ही अट शिथिल केल्याने गर्दी थोडी थंडावली. सदर योजनेकरिता कागदपत्र जुळवताना महिलांची दमछाक होत असल्याचे शासनाच्या लक्षात आल्याने, तहसीलमधून निघणारे अधिवास प्रमाणपत्र (डोमिसाईल), उत्पन्नाचा दाखला यात शिथिलता आली आहे. ज्यांच्याकडे पिवळे व केशरी शिधापत्रिका आहे, अशांना उत्पन्नाच्या दाखल्याची अट रद्द करण्यात आली आहे. ज्यांच्याकडे 15 वर्षांपूर्वीचे मतदान कार्ड किंवा रेशन कार्ड, जन्माचा दाखला आहे, अशांना डोमिसाईल ची अट रद्द करण्यात आली आहे.


