किनवटमाहूर

अटीतटीच्या लढतीत आ.भीमराव केराम पुन्हा विजयी

पक्षश्रेष्ठीचा विश्वास,महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली - आ.भीमराव केराम

किनवट – किनवट – माहूर विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार आ.भीमराव केराम व महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाचे उमेदवार माजी आ.प्रदीप नाईक या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांत झालेल्या अटीतटीच्या लढतीत पहिल्या फेरीत आघाडीत असलेले आ.केराम तिसऱ्या फेरीत पिछाडीवर आले.त्यानंतर १८ व्या फेरीपासून त्यांनी नाईकांची आघाडी रोखत त्यांच्यावर ५ हजार ६३६ मतांची निर्णायक आघाडी घेत पुन्हा विजय मिळविला.

किनवट विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी गोकुंद्याच्या आयटीआय इमारतीत शनिवारी दि.२३ सकाळपासून सुरु झाली.टपाली मतमोजणीनंतर माहूर भागाकडून मतमोजणी सुरू झाली.पहिल्या फेरीत आ.केराम यांना केवळ २५३ मतांची आघाडी मिळाली.त्यानंतर तिसऱ्या,चौथ्या फेरीत नाईकांनी आघाडी घेतली.त्यांची आघाडी वाढतच होती. माहूरनंतर किनवट,गोकुंद्यामधील मतमोजणीत नाईकांची आघाडी कापण्यात केरामांना यश आले.चैोदाव्या फेरीत ५ हजार ५१३ मतांच्या आघाडीवर असलेले प्रदीप नाईक १७ व्या फेरीत पिछाडीवर गेले.१७ व्या फेरीपासून केराम यांनी निर्णायक आघाडी घेतली.अखेरच्या फेरीत आ.भीमराव केराम यांना ९२ हजार ८५६ मते मिळाली.तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी प्रदीप नाईक यांना ८७ हजार २२० मते मिळाली. रिपब्लिकन पक्ष खोरिपाचे उमेदवार अशोक ढोले यांना ५ हजार ३११ मते मिळाली.सन २०१९ च्या निवडणुकीत ११ हजार ७६४ मते घेणाऱ्या वंचित आघाडीने या निवडणुकीत ४ हजार ५१५ मतेच घेतली. अपक्ष सचिन जाधव – नाईक यांनी ५ हजार ५११ मते घेतली.प्रदीप नाईक यांना गतवेळीच्या तुलनेत यावेळी १० हजार ८६४ मते कमी मिळाली. तर केरामांच्या मतात १० हजार २३ मतांची भर पडली.गेल्यावेळी नोटाला १०४१ तर यावेळी १२६६ मते मिळाली.या निवडणुकीत २ लाख २ हजार ३६० मते वैध ठरली.शेवटपर्यंतच्या अटीतटीच्या लढतीत आमदार भीमराव केराम यांनी मतदारसंघावर पुन्हा आपले वर्चस्व सिद्घ केले आहे.विजयानंतर मोठ्या शक्तिप्रदर्शनात आ.केराम यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.                                                                                     पक्षश्रेष्ठीचा विश्वास,महायुतीच्या कार्यकर्त्यांची मेहनत फळाला आली – आ.भीमराव केराम          भाजप पक्षश्रेष्ठीने माझ्यावर पुन्हा विश्वास करुन मला उमेदवारी दिली.पक्षाचे सर्व नेते तसेच महायुतीचे पदाधिकारी,ग्रामीण भागातील सर्व कार्यकर्त्यांनी माझा विजयासाठी मोठी मेहनत घेतली.मागील अडीच वर्षाच्या कार्यकाळात शेतकरी,कष्टकरी,महिला यांच्या समस्या सोडविण्यात आपण यशस्वी झालो.मला अधिकच्या लीडची अपेक्षा होती.तरीपण या विजयावर आपण समाधानी आहोत.या विजयाचे श्रेय आपण पक्ष नेतृत्वासह महायुतीच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह मतदारांना देतो,अशी प्रतिक्रिया विजयानंतर आमदार भीमराव केराम यांनी दिली.यापुढेही आपण मतदारांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही,अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Related Articles

Back to top button