पीक विमा प्रस्ताव सादर करताना दक्षता घ्या – बालाजी मुंडे

किनवट, दि.02 (प्रतिनिधी) : प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2024 चे पीक विमा पोर्टल सुरू झाले आहे. पीक विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत 15 जुलैपर्यंत असून, विमा प्रस्ताव सादर करताना शेतकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी बालाजी मुंडे यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विमा हप्ता भरताना ऑनलाइन सेवा केंद्र (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रांवर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा प्रथम विमा हप्ता भरून घ्यावा. तसेच विमा भरपाई मिळण्यास अवधी असल्याने, दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांनी त्यांच्या नावामधील दुरुस्ती करून घेण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. तसेच शेतकऱ्यांच्या नावात पूर्णतः बदल, असेल तर अशा शेतकऱ्यांचा विमा भरून घेऊ नये. कारण विमा भरपाई मिळताना शेतकऱ्यांच्या आधार कार्डशी जे बँक खाते लिंक आहे, अशा बँक खात्यावरच जमा होणार आहे. त्यामुळे बँकेचे पासबुक, आधारकार्ड व सातबारावरील नाव एकच असणे आवश्यक आहे.
सर्व ऑनलाइन सेवा केंद्र चालकांनी आधारकार्ड, सातबारा व बँक पासबुक इत्यादी कागदपत्रावर शेतकऱ्यांच्या नावात किरकोळ बदल असेल, तर त्या शेतकऱ्यांचा विमा हप्ता त्वरीत भरून घेऊन शेतकऱ्यांनी दरम्यानच्या काळात त्यांचे नावात दुरुस्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे.
बालाजी मुंडे तालुका कृषी अधिकारी,किनवट.


