किनवट

मुलीचे अपहरण करुन अत्याचार केल्याप्रकरणी शिवणी येथील आरोपीस वर्षभराचा कारावास

किनवट – एका मुलीचे अपहरण केल्यानंतर जंगलात नेवून तिच्यावर बळजबरी अत्याचार करणाऱ्या शिवणी येथील एका आरोपीला मंगळवारी दि.२ एप्रिल रोजी नांदेडच्या विशेष पोक्सो न्यायालयाने एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.                      किनवट तालुक्याच्या इस्लापूर पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या शिवणी येथील एक मुलगी दि.२७ नोव्हेंबर २०२२ च्या रात्री घरच्या मंडळींसोबत घरात बोलत बसली होती.त्याचवेळी बाहेरून कुणीतरी आवाज दिल्याने त्या मुलीने दार उघडले.बाहेर पीडित मुलीच्या वडिलाच्या आयशर टेम्पोवर क्लिनर म्हणून काम करणारा राजरतन उर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे व गावातीलच विकास श्रावण आंबेकर हे मोटारसायकल घेऊन उभे होते. त्या दोघांनी मुलीला दोघांच्यामध्ये बसवून तिचे तोंड दाबून तिला कंचेली फाट्याच्या जंगलात घेऊन गेले.राजरतन व त्या मुलीला जंगलात सोडून विकास आंबेकर हा परत निघून गेला.त्यानंतर राजरतन उर्फ बाळ्याने अपहृत मुलीला जीवे मारण्याची धमकी देत कंचेली जंगलात अज्ञातस्थळी नेऊन तिच्यावर शारीरिक अत्याचार केले.घटनेच्या दुसऱ्यादिवशी पीडित मुलीच्या घरच्यांनी मुलीचा शोध घेत कंचेली जंगल गाठले.नातेवाईक आजा रोशन व इतरांना पाहून मुलीने आवाज दिला.त्यांना घडला प्रकार सांगितल्यानंतर याप्रकरणी पीडित मुलीने दि.२९ नोव्हेंबर २०२२ रोजी राजरतन व त्याचा सहकारी विकास आंबेकर यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली.त्यावरून इस्लापूर पोलिसांनी वरील दोघांविरुद्ध भादंविच्या कलम ३६३,३६६ ( a),३७६,३४ व सहकलम ४,६ पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल केला.त्यानंतर सदर प्रकरणी स.पो.निरीक्षक आर.टी.शेवाळे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केला.याप्रकरणाची अंतिम सुनावणी नांदेडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विशेष पोक्सो न्यायालयाचे न्या.आर.एम.पांडे यांच्या न्यायदालनात मंगळवारी दि. २ झाली.न्या.पांडे यांनी याप्रकरणात ८ जणांनी नोंदविलेली साक्ष,पोलिसांनी दिलेले पुरावे तसेच दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी राजरतन उर्फ बाळ्या व्यंकटी कांबळे यास भादंविच्या कलम ३५४ अंतर्गत १ वर्ष सश्रम कारावासासह ३ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.अन्य आरोपी विकास आंबेकर याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याप्रकरणात सरकार पक्षाची बाजू जिल्हा सरकारी वकील रणजीत देशमुख व विशेष सरकारी अभियोक्ता मनीकुमारी डांगे यांनी मांडली.पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी एम.पी.गिमेकर यांनी काम पाहिले.

Related Articles

Back to top button