किनवट

गोकुंद्यात एसबीआयच्या एटीएमसह 21 लाखांची रोकड पळविली

किनवट (प्रतिनिधी)- किनवट माहूर रस्त्यावरीलगजबजलेल्या गोकुंदा येथील स्व. बाळासाहेब ठाकरे चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन 21 लाखांच्या रोकडसह अज्ञातांनी पळविली. या घटनेमुळे ग्राहकांत खळबळ माजली आहे.

गोकुंद्याच्या बाळासाहेब ठाकरे चौकात स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. शाखेशेजारीच या बँकेच्या दोन एटीएम मशीन आहेत. बुधवारी पहाटे 2 ते 2.20 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बँकेचे एटीएम मशीन रोकडसह पळवून नेले. या मशीनमध्ये पाचशे रुपयांच्या 3 हजार 807, तर शंभर रुपयांच्या 208 असे एकूण 21 लाख 4 हजार 300 रुपये लंपास झाले. एटीएम पळविल्याची घटना बुधवारी सकाळी कळताच एटीएम चॅनल मॅनेजर बालाजी वाघमारे यांनी किनवट पोलिसांत तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल केला. घटनेची माहिती मिळताच भोकर विभागाचे अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्यासह किनवट, इस्लापूर, सिंदखेड, मांडवी, माहूर ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी एक अनोळखी तवेरा जिप व दोन मोटारसायकल सापडल्याचे सांगण्यात आले.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक देविदास चोपडे करीत आहेत. बँक खाते, सीमकार्ड बंद पडणार असल्याची थाप मारून गत आठवड्यात एका शेतकऱ्याचे कॅनरा बँकेतील 10 लाख रुपये गायबझाल्याची घटना घडली. तत्पूर्वी दि. 6 ऑगस्ट 2024 रोजी शहरातील ‘भाग्यलक्ष्मी’ बँकेच्या एटीएममधून 17 लाख 39 हजारांची रोकड गायब झाली. या प्रकरणात चौकशीअंती कुंपणानेच शेत खाल्ल्याचा प्रकार उघडकीस आला होता. आता तर रकमेसह चक्क मशीनच गायब झाल्याने याप्रकरणाचा गुंता वाढला आहे. पोलीस तपासात काय निष्पन्न होईल, याची उत्सुकता एसबीआय बँकेच्या ग्राहकांना लागली आहे.

किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रधानसांगवी येथील एका महिलेचे कॅनरा बँकेचे खाते असून त्याला लिंक असलेला पतीचा मोबाइल नंबर लिंक असल्याने सिमकार्ड बंद होणार आहे. म्हणून बँक खात्याला लिंक असलेल्या नवऱ्याला ओटीपी मागितला अन् महिलेच्या खात्यातील 10 लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याची घटना ताजी आहे. आता गोकूंदा येथील एटीएममधील लाखो रुपये लांबवल्याने एकच खळबळ उडाली आहे

Related Articles

Back to top button