किनवट

किनवटमध्ये १३.५० लाखांचा गुटखा वाहनासह जप्त ; तस्कर फरार

किनवट – हिमायतनगर येथूून किनवट तालुक्याच्या सारखणी येथे जाणाऱ्या बोलेरो पीकअप व्हॅनमधून पोलिसांनी १३ लाख ३८ हजाराचा विविध कंपनीचा गुटखा शुक्रवारी दि.६ जप्त केला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख रू.किमतीचे वाहनही जप्त केले.                                          अवैध धंदे करणाऱ्यांविरुद्ध ‘ऑपरेशन फ्लॅश आऊट ‘अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिले आहेत.त्यानुसार येथील पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील बिर्ला, नाईट चेकिंग अधिकारी फौजदार चाँद व त्यांचे सहकारी शुक्रवारी पहाटे गस्तीवर असताना हिमायतनगर येथून बोलेरो पीकअप वाहनाने शासनाने प्रतिबंधीत केलेल्या गुटख्याची सारखणीकडे तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार बोलेरो वाहन क्र.एम.एच. २६ – सी एच १४४३ हा किनवट शहराच्या डॉ.आंबेडकर चौकात येताच पोलिसांनी चालकाला हटकले.वाहनाची झडती घेतली असता,आत विविध कंपनीचा तब्बल १३ लाख ३८ हजार रुपयाचा गुटखा आढळून आला.पोलिसांनी गुटख्याच्या साठ्यासह ७ लाख रु.किमतीचे वाहन असा एकूण २० लाख ३८ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी फौजदार चाँद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी वाहनचालक शेख वसीम शेख रजाक रा. हिमायतनगर याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंस्थेच्या कलम १३२,२२३,२७५ सह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला.जप्तीच्या कारवाईदरम्यान आरोपी पसार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles

Back to top button