किनवट

सर्वांगीण विकासासाठी कटिबद्धः खा. आष्टीकर

किनवट / प्रतिनिधी  लोकसभा निवडणुकीत किनवटच्या जनतेने मला भरभरून मतदानरुपी आशीर्वाद दिले. खासदार झाल्यानंतर किनवटला भेट देण्यास मला थोडा विलंब झाला असला तरी जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्त किनवट शहर व तालुक्यातील विकासाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी दिली.

महाविकास आघाडीचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे दि. २४ सप्टेंबर रोजी पहिल्यांदाच किनवट दौऱ्यावर आले होते. खा. आष्टीकर म्हणाले की, किनवटच्या जनतेने महाविकास आघाडीला भरभरून मतदान केले. येथील जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. निवडणुकीनंतर मला थोडा विलंब जरी झाला असला तरी या तालुक्याकडे माझे विशेष लक्ष आहे. जनसंपर्क दौऱ्याच्या निमित्त मी गावा गावात भेटी देऊन येथील समस्या जाणून घेणार आहे. रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग व अन्य जे प्रश्न आहेत ते प्राधान्याने निश्चितपणे मार्गी लावले जातील. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामील असल्यामुळे त्या त्या पक्षातील अनेक जण उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. कोणाचा पत्ता कट होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार आहे असे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील निधन झालेल्या कुटुंबीयांच्या घरी भेटी घेऊन सांत्वन केले व जिजामाता चौकात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जनसंपर्क दौऱ्याची सुरुवात केली. तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली असून त्यानंतर गोकुंदा, बोधडी, जलधरा व इस्लापूर भागातील गावांचा दौरा केला. दरम्यान करडपवार, शुभम माहूरकर, उदय जागरलावार, संदीप जाधव, श्रीहरी बरकुंटीवार, प्रसाद कतेवार, अभिजित कसबे, राजू जाधव, तिलक पिंपले, पवन सपे यांनी खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या जनसंपर्क दौऱ्यात खा. नागेशा पाटील यांच्या समवेत किनवट माहूर तालुक्यातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना उबाठा गटाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Back to top button