उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ माहितीपटाचे प्रकाशन
आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या पुढाकारातून उभारलेल्या वाडी (बु.) येथील १०० खाटांच्या रुग्णालयाचा विकासप्रवास चित्रित; छायाचित्रकार विजय होकर्णे यांची निर्मिती

नांदेड : वाडी (बु.) येथील १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या उभारणीचा विकासप्रवास उलगडणाऱ्या ‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ या माहितीपटाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या प्रेरणेतून छायाचित्रकार विजय होकर्णे यांनी या माहितीपटाची संकल्पना, संहिता लेखन व निर्मिती केली आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार हेमंत पाटील, आनंद तिडके-बोंढारकर, प्रताप पाटील चिखलीकर, अमरनाथ राजुरकर आणि भीमराव केराम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वाडी व परिसरातील नागरिकांना आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी विधिमंडळात सातत्याने मागणी करून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना राज्य शासनाचे सहकार्य लाभले. या रुग्णालयाच्या मुख्य इमारतीसह अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा व्यवस्था, संरक्षक भिंत, वाहनतळ, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आणि अग्निशमन व्यवस्थेसारख्या सुविधांची उभारणी करण्यात आली. मुख्य इमारतीसाठी ५३ कोटी ३४ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.
या माहितीपटात रुग्णालयाच्या उभारणीमागील लोकप्रतिनिधींचे प्रयत्न, शासनाचे सहकार्य, सार्वजनिक बांधकाम व सार्वजनिक आरोग्य विभागाचे योगदान चित्रफिती आणि छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहे. विशेष म्हणजे, केवळ इमारतीच्या उभारणीपुरते मर्यादित न राहता १०० खाटांची क्षमता, वैद्यकीय सुविधा, डॉक्टर व कर्मचाऱ्यांची नियुक्ती, औषधसाठा आणि नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा मिळण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले आहे.
महेश होकर्णे यांनी माहितीपटाचे छायाचित्रण केले आहे. ‘आरोग्य सेवेचे नवे पर्व’ हा माहितीपट म्हणजे केवळ रुग्णालयाच्या उभारणीचा दस्तऐवज नसून परिसरातील हजारो नागरिकांच्या आरोग्यविषयक अपेक्षा आणि निरोगी भविष्याची आशा अधोरेखित करणारा महत्त्वपूर्ण प्रयत्न ठरत आहे.



