किनवट

किनवट विधानसभा मतदारसंघातील 17 पैकी 15 उमेदवारांची ‘अनामत’ रक्कम जप्त 11 उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते

किनवट, दि.28 (प्रतिनिधी) : किनवट  विधानसभेच्या निवडणूक रिंगणातील एकूण 17 उमेदवारांपैकी विजयी उमेदवार महायुतीचे  भीमराव केराम व नजिकचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे प्रदीप नाईक वगळता उर्वरित 15 ही  उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. उल्लेखनीय बाब  म्हणजे किनवट विधानसभेसाठी झालेल्या एकूण मतदानात ‘नोटा’ला 1,266 मते मिळाली असून, निवडणूक रिंगणातील  11 उमेदवारांना ‘नोटा’ पेक्षा कमी मते   पडलेली आहेत.

किनवट विधानसभा मतदारसंघात एकूण  2 लाख 78 हजार 665 मतदार आहेत. त्यापैकी ‘ईव्हीएम’  वरील  आणि टपाली मिळून एकूण 2 लक्ष 02 हजार 497 एवढे मतदान प्रत्यक्षात झाले. त्यातील ‘नोटा’ ची 1 हजार 266 मते आणि पोस्टल मतांमध्ये बाद झालेली 137 मते वगळता  एकूण वैध मते 2 लाख 01 हजार 094 आहेत. अनामत रक्कम वाचविण्यासाठी उमेदवाराला  निवडणुकीत सर्व उमेदवारांना पडलेल्या एकूण वैध मतांच्या सहाव्या हिश्श्याने (एक षष्ठांश ) म्हणजेच 16.666 टक्के मते मिळाली, तरच संबंधित उमदेवाराला त्याची डिपॉझिटची रक्कम परत मिळते. . एकूण वैध मतांची गणना करताना ‘नोटा’ला मिळालेली मते विचारात घेतली जात नाहीत. निवडणूक रिंगणात कमीत कमी उमेदवार उतरावेत, तसेच निवडणुकीचे गांभीर्य त्यांना राहावे, म्हणूनच आयोगाने अनामत रकमेची अट घातली आहे. त्यानुसार किनवट विधानसभा क्षेत्रातील उमेदवाराला ‘अनामत’ राखण्यासाठी किमान 33 हजार 516  मते मिळविणे गरजेचे होते. परंतु, महायुतीचे विजयी उमेदवार भीमराव केराम आणि दुसऱ्या स्थानी राहिलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रदीप नाईक या दोघांतच अटीतटीची झुंज झाली. निवडणूक रिंगणातील तिसऱ्या ते सहाव्या क्रमांकाची मते घेतलेल्या उमेदवारांना सहा हजार पेक्षा कमी मते मिळाली आहेत. जी की, अनामत (डिपॉझिट) राखण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांच्या 20 टक्केही नाहीत. उर्वरीत 11  उमेदवारांना तर नोटाला मिळालेल्या 1,266 मतांपेक्षा कमी मते पडलेली आहेत. त्यामुळे या 15 ही उमेदवारांवर अनामत रक्कम गमावण्याची नामुष्की आली आहे.

किनवट विधानसभा क्षेत्रात भाजपा, रा.काँ.शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी, बहुजन समाज पार्टी,  रिपब्लिकन पक्ष खो.री.पा., इंडियन नॅशनल लीग, राष्ट्रीय समाज पक्ष  अशा  सात पक्षांसह 10 अपक्षांचा पर्याय मतदात्यांसमोर होता. किनवट विधानसभेसाठी केल्या गेलेल्या  एकूण 2 लक्ष 02 हजार 360 मतदानांपैकी 1 हजार 266 मतदारांनी उपरोक्त 17  ही उमेदवारांना नापसंती दर्शवीत ‘नोटा’चा पर्याय निवडला. जे की, एकूण वैध मतांच्या 0.63 टक्के इतकी मते आहेत. याशिवाय पोस्टलमध्ये 137 मते बाद झाली आहेत.

सन् 1962 ते 2024 या कालावधीमध्ये किनवट विधानसभा क्षेत्रात पार पडलेल्या एकूण 14 विधानसभा निवडणुकीमध्ये (1993 ची पोट निवडणूक सोडून) एकूण 142 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी आतापर्यंत तब्बल  111 उमेदवारांनी आपली अनामत रक्कम गमावलेली आहे.

‘‘निवडणुकीत हार-जीत तर होतच राहते; परंतु पराभवामध्ये दोन प्रकार आहेत. यातील दारुण पराभवापेक्षाही भयंकर असते ते ‘डिपॉझिट’ म्हणजे अनामत रक्कम जप्त होणे. कारण अशा प्रकारे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर किमान निर्धारित मतेही न मिळाल्यामुळे, अनामत रक्कम जप्त झाल्यास उमेदवाराच्या दृष्टीने ती मोठी लाजिरवाणी बाब ठरते. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश अर्थात 16.33 मतेही न मिळवणाऱ्या   उमेदवारांची अनामत रक्कम जप्त केली जाते. भारतीय लोकप्रतिनिधी 1951 नुसार विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला अर्ज दाखल करतांना 10 हजार रुपयांची अनामत (डिपॉझिट) रक्कम  जमा करावी लागते. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचित जमातीच्या (एस.टी.) उमेदवारांना यातून अर्ध्या रकमेची  सूट देण्यात आल्यामुळे त्यांना केवळ 5 हजार रुपये अनामत रक्कम जमा  करावी लागते. लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी हीच अनामत रक्कम सामान्य उमेदवारांना 25 हजार रुपये आणि एससी, एसटी साठी 12 हजार 500 रुपये आहे.’’  

Related Articles

Back to top button