मातामृत्यूच्या घटनेने आरोग्य यंत्रणा हादरली; आमदार केराम आक्रमक!
पायलच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी; मांडवी ग्रामीण रुग्णालयातील सुविधांबाबत प्रशासनाला जाब

किनवट, : किनवट तालुक्यातील मांडवी येथील कै. बळीराम पाटील शासकीय ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावामुळे 22 वर्षीय सोनी ऊर्फ पायल प्रवीण पेंदोर यांचा झालेला मृत्यू अत्यंत दुर्दैवी आणि मन हेलावून टाकणारा आहे. नवजात बालकाच्या जन्मानंतर कुटुंबात आनंदाचे वातावरण असतानाच आईचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेने व्यथित झालेले आमदार भीमराव केराम यांनी जिल्हा शल्यचिकित्सक, नांदेड यांना पत्र देऊन घटनेची सखोल चौकशी करण्यासह दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
28 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 5 वाजता पायल यांची मांडवी ग्रामीण रुग्णालयात सामान्य प्रसूती झाली. त्यांनी 3 किलो 200 ग्रॅम वजनाच्या मुलाला जन्म दिला. मात्र, प्रसूतीनंतर सुमारे तीन तास रक्तस्राव सुरू असतानाही आवश्यक उपचार वेळेत मिळाले नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यानंतर सकाळी ८ वाजता त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. गर्भाशयात वार राहिल्यामुळे अतिरक्तस्राव झाल्याचे सांगण्यात येत असून, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
प्रसूतीनंतरचा रक्तस्राव वेळीच नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपचार झाले असते, तर पायल यांचा जीव वाचू शकला असता का, असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाला आहे. दुर्गम आदिवासी भागातील महिलांना प्रसूतीसारख्या मूलभूत आरोग्यसेवेदरम्यान जीव गमवावा लागत असेल, तर ग्रामीण आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन होणे गरजेचे असल्याचे आमदार केराम यांनी म्हटले आहे.
या प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांची भूमिका, उपचारांच्या नोंदी, अतिरक्तस्राव रोखण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न तसेच रुग्णाला यवतमाळ येथे संदर्भित करण्याच्या निर्णयातील विलंब या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करावी. वैद्यकीय निष्काळजीपणा किंवा कर्तव्यात कसूर आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
ग्रामीण रुग्णालयात सुविधांचा अभाव दूर करा
मांडवी ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञ, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधसाठा आणि आपत्कालीन उपचार सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. गंभीर रुग्णांना वेळेत उच्चस्तरीय उपचार मिळण्यासाठी सक्षम रुग्णवाहिका आणि प्रभावी संदर्भसेवा उभारावी, अशी मागणीही आमदार केराम यांनी केली आहे.
किनवट-माहूरसह सीमावर्ती आदिवासी भागातील रुग्णांना तेलंगणातील आदिलाबाद येथील रिम्स रुग्णालयात विनाअडथळा उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र शासनाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधावा, असेही त्यांनी सुचविले आहे.
“एका आईचा जीव गेल्यानंतर चौकशी होणे महत्त्वाचे आहेच; मात्र भविष्यात दुसऱ्या कोणत्याही मातेचा जीव जाऊ नये, यासाठी आरोग्य व्यवस्थेत ठोस बदल होणे अधिक महत्त्वाचे आहे. पायलच्या मृत्यूची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी आणि आदिवासी भागातील महिलांना सुरक्षित प्रसूतीचा अधिकार प्रत्यक्षात मिळवून द्यावा,” अशी ठाम भूमिका आमदार भीमराव केराम यांनी व्यक्त केली.
पायलच्या नवजात बाळाच्या डोक्यावरील मातृछत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडवी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आरोग्य प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.



