बालकांच्या सुरक्षिततेसाठी पोक्सो कायद्याबाबत जनजागृती आवश्यक!
दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने यांचे प्रतिपादन; सरस्वती विद्यामंदिरात सुरक्षित बचपन अभियानाचा समारोप

किनवट, : बालपण हा आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ असून, या काळात प्रत्येक बालकाला सुरक्षितता, प्रेम, सन्मान आणि विश्वास मिळणे आवश्यक आहे. बालकांवरील अत्याचार, लैंगिक शोषण आणि बालहक्कांचे उल्लंघन रोखण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे गरजेचे आहे. तसेच बालकांना त्यांच्या हक्कांची आणि संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची माहिती देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश पी. एम. माने यांनी केले.
येथील सरस्वती विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित ‘सुरक्षित बचपन अभियान’ तसेच लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम (पोक्सो) कायदा, २०१२ या विषयावरील अखिल भारतीय शालेय जनजागृती मोहिमेच्या समारोपीय कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
यावेळी सहदिवाणी न्यायाधीश के. जी. मेंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. ॲड. एस. पी. दारवंडे, ॲड. आर. डी. सोनकांबळे, अधिकार मित्र (पी.एल.व्ही.) तसेच उपप्राचार्य डॉ. पंजाब शेरे यांनी मार्गदर्शन करताना बालसुरक्षेचे महत्त्व, पोक्सो कायद्यातील विविध तरतुदी आणि बालकांच्या हक्कांविषयी कायदेविषयक व शैक्षणिक माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. विलास सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अधिकार मित्र (पी.एल.व्ही.) उत्तम कानिंदे यांनी केले, तर शिक्षिका राधिका तिरमनवार यांनी आभार मानले.
कार्यक्रमास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आदिवरद नेम्माणीवार, कला महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी, ॲड. दिलीप काळे, ॲड. संकेत राठोड, ॲड. एस. एम. सर्पे, न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक एम. के. शेख, पैरवी अधिकारी पी. एन. गुरनुले, पोलीस कॉन्स्टेबल वागतकर तसेच न्यायालयीन कर्मचारी भारत राठोड यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रो. डॉ. सुनील व्यवहारे, पर्यवेक्षक प्रा. रेणुकादास पहुरकर, प्रा. सुहास कुलकर्णी, प्रा. शेषीकांत ठोंबरे, चंदन यंड्रलवार, संध्या सिरमनवार, गणपत चाभरकर, ईश्वर बावणे, करण मुंडे, ऋषभ पडधरिया, ओमेश्वर राठोड, निखिल सिरमनवार, रेश्मा फयाजोद्दीन, तृप्ती बावणे, रचना तक्कलवार, सेवक लक्ष्मण कासाडीवर तसेच सेवानिवृत्तीच्या दिवशीही सेवाभाव जपत सहकार्य करणारे मधुकर ताडपेल्लीवार यांनी परिश्रम घेतले.



