Uncategorized

घोटी येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’; पॉक्सो कायद्याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

ॲड. दीपा सोनकांबळे-सूर्यवंशी यांनी ‘गुड टच-बॅड टच’, बालहक्क आणि बालसुरक्षेविषयी केले प्रबोधन

किनवट : तालुका विधी सेवा समिती, किनवट आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने महात्मा जोतीराव फुले माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय, घोटी येथे ‘सुरक्षित बचपन अभियान’ अंतर्गत पॉक्सो कायदा आणि बालसुरक्षेविषयी जनजागृतीपर मार्गदर्शन सत्र उत्साहात पार पडले. यावेळी किनवट बार असोसिएशनच्या सदस्या ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दीपा सोनकांबळे-सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांना कायदेशीर तरतुदींची माहिती देत बालसुरक्षेबाबत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य गडलिंग सर होते. प्रमुख पाहुणे म्हणून न्यायालयाचे वरिष्ठ लिपिक शेख मुजाहीद, ॲड. विलास सूर्यवंशी, तसेच भालेराव सर आणि पाटील सर उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना ॲड. सोनकांबळे-सूर्यवंशी यांनी बालकांना सुरक्षित, निर्भय आणि आनंदी वातावरणात जगण्याचा अधिकार असल्याचे सांगितले. बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी २०१२ मध्ये लागू करण्यात आलेल्या पॉक्सो कायद्याची माहिती देताना १८ वर्षांखालील प्रत्येक व्यक्तीला या कायद्यानुसार बालक मानले जाते, तसेच मुलगा आणि मुलगी अशा दोघांनाही हा कायदा समान संरक्षण देतो, असे स्पष्ट केले. चौकशी आणि न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान बालकांवर मानसिक ताण येऊ नये, यासाठी बालस्नेही वातावरण राखण्याच्या तरतुदींचीही त्यांनी माहिती दिली.

विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक सोप्या उदाहरणांसह समजावून सांगितला. शरीराच्या खासगी भागांविषयी जागरूक राहण्याचे आवाहन करताना कोणताही असुरक्षित स्पर्श किंवा अनुचित प्रकार घडल्यास घाबरून न जाता स्पष्टपणे नकार देणे, सुरक्षित ठिकाणी जाणे आणि विश्वासू व्यक्तीला तत्काळ सांगणे, असा ‘नो-गो-टेल’ हा सुरक्षा मंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. तसेच बालकांसाठी १०९८ आणि आपत्कालीन मदतीसाठी ११२ या हेल्पलाइन क्रमांकांची माहिती दिली.

यावेळी त्यांनी स्वतः रचलेली ‘माझं बालपण, माझं रक्षण!’ ही कविता सादर करून बालसुरक्षेचा संदेश प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविला. तसेच पॉक्सो कायद्यातील कलम १९ नुसार बालकांवरील लैंगिक अत्याचाराची माहिती संबंधित यंत्रणेला देण्याचे कर्तव्य, पालक व शिक्षकांची जबाबदारी आणि कायद्याच्या कठोर अंमलबजावणीचे महत्त्व विशद केले.

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य गडलिंग सर यांनी अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन स्वतःच्या सुरक्षिततेविषयी जागरूकता वाढते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमास शिक्षक राजेश कदम, भरकड, राजू पाटील, संतोष चव्हाण, आनंद गव्हाणे, कीर्ती भंडारे, पाटील मॅडम यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि वकील वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन करण्यात आले. या उपक्रमातून घोटी परिसरात बालहक्क आणि बालसुरक्षेविषयी जनजागृती करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न झाला.

Related Articles

Back to top button