सहस्रकुंड आटला; पैनगंगाही कोरडी, उन्हाळ्यापूर्वीच जलसंकटाची चाहूल!
मुक्या जीवांच्या घशाला कोरड; वाघ-बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे मोर्चा वळण्याची भीती; वनक्षेत्रात उपाययोजनांसाठी आमदार भीमराव केराम यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

किनवट, शकिल बडगुजर : ऑक्टोबर–नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत पाण्याने ओसंडून वाहणारा किनवट तालुक्यातील प्रसिद्ध सहस्रकुंड धबधबा यंदा ऑक्टोबर महिन्यातच कोरडाठाक पडल्याचे चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे, परिसरातील जीवनवाहिनी मानली जाणारी पैनगंगा नदीही कोरडी पडल्याने आगामी उन्हाळ्यापूर्वीच जलसंकटाची तीव्र चाहूल लागली आहे. नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह थांबल्याने नागरिकांसह पशुपक्षी, पशुधन आणि जंगलातील वन्यजीवांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
सहस्रकुंड धबधबा आणि पैनगंगा नदी हे या परिसरातील महत्त्वाचे नैसर्गिक जलस्रोत आहेत. मात्र, हिवाळा सुरू होण्यापूर्वीच हे जलस्रोत आटल्याने आगामी उन्हाळ्यात परिस्थिती अधिक बिकट होण्याची चिन्हे आहेत. विहिरी, नाले, तलाव आणि लहान जलस्रोतांमधील पाणीसाठाही कमी झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागू शकते. पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था करणेही शेतकरी आणि पशुपालकांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.
वाघ–बिबट्यांचा मानवी वस्त्यांकडे वावर वाढण्याची चिंता
किनवट–माहूर परिसरातील जंगलांमध्ये पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने वाघ आणि बिबट्यांसारखे हिंस्र वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांच्या जवळ येत असल्याची चिंता व्यक्त होत आहे. गेल्या महिनाभरात पशुधनावर हल्ल्यांच्या घटना घडल्याने शेतकरी आणि पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटल्यास वन्यप्राण्यांचा मानवी वस्त्यांकडे वावर आणखी वाढण्याची शक्यता असून, संभाव्य मानव–वन्यजीव संघर्षाचे संकट अधिक गंभीर होऊ शकते.
वनक्षेत्रातील पाणवठे कार्यान्वित करा; वनवणवा रोखण्यासाठी उपाययोजना करा!
संभाव्य मानव–वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी जंगलातील बंद अथवा कोरडे पडलेले पाणवठे तातडीने कार्यान्वित करावेत, आवश्यक ठिकाणी नवीन पाणवठे निर्माण करावेत आणि वनवणवा प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आमदार भीमराव केराम यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे पत्राद्वारे लक्ष वेधून किनवट–माहूरमधील वनक्षेत्रात तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची विनंती केली आहे.
उन्हाळ्यापूर्वीच उपाययोजनांची गरज
सहस्रकुंड धबधबा आणि पैनगंगा नदी कोरडी पडणे ही आगामी पाणीटंचाईची गंभीर पूर्वसूचना मानली जात आहे. त्यामुळे महसूल, वन आणि संबंधित विभागांनी आतापासूनच समन्वयाने जलसंधारणाच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याचे नियोजन, पशुधनासाठी पाण्याची उपलब्धता, जंगलातील नैसर्गिक व कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती आणि त्यांची नियमित देखभाल यावर भर देण्याची गरज आहे. त्याचबरोबर वनवणवा रोखण्यासाठीही प्रतिबंधात्मक यंत्रणा सज्ज ठेवणे आवश्यक आहे.
एकीकडे नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, तर दुसरीकडे जंगलातील मुक्या जीवांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संकट प्रत्यक्ष उभे राहण्याची वाट न पाहता प्रशासनाने ठोस कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.



